Sat, Apr 20, 2019 23:54होमपेज › Ahamadnagar › वृद्ध महिलेचा गुंतवणूकदारांना चुना!

वृद्ध महिलेचा गुंतवणूकदारांना चुना!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नेवासा : कैलास शिंदे 

जादा पैशाचे आमिष दाखवून एका वृद्ध महिलेने अनेक महिलांसह नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना नेवासा बुद्रुक परिसरात उघडकीस आली आहे. त्यामुळे जादा पैशाच्या मोहाला बळी पडलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बाबाही गेला अन् दशम्याही गेल्या, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, की नेवासा शहरात गेल्या पाच-सहा महिन्यांपूर्वी ज्ञानेश्वर मंदिरात झालेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात धुळे जिल्ह्यातील एका वृद्ध महिलेची स्थानिकांशी ओळख झाली. त्यानंतर ही महिला पलीकडील नेवासा बुद्रुक येथे तोंडओळखीच्या आधारे एका कुटुंबाकडे राहात होती. सकाळ-संध्याकाळ पूजेच्यावेळी आसपासच्या महिलांबरोबर गप्पा मारत ओळख करत होती. या ओळखीचा फायदा या महिलेने घेऊन महिलांकडून उसने पैसे घेण्याचा प्रयत्न केला. विश्वास संपादन करण्यासाठी घेतलेले पैसे तातडीने पैशाचा मोबदला जादा देवून विनासायासही दिला जात होता. त्यामुळे कोणी कोणास या दिलेल्या पैशाबाबत बोलत नसे. परंतु या वृद्धेस पैसे दिले, तर जादा पैसे मिळतात, अशी चर्चा मात्र परिसरात महिला करित होत्या. त्यामुळे या महिलेला उसणे पैसे देण्यासाठी अनेकांचे हात पुढे येत होते. 

हा विना लिखापढीचा सावकारी धंदा गेल्या पाच-सहा महिन्यांपासून बिनबोभाट सुरूच होता. हजारचे आकराशे, पाच हजारचे सह हजार, पन्नास हजारांचे पंचावन्न हजार, असा व्यवहार या वृद्ध महिलेकडून सुरू होता. 

अनेकांना विशेषत: महिलांना झटपट पैसे कमविण्याचा मार्ग वाटत असल्याने अनेक महिलांनी घरात कोणालाही न सांगता या महिलेकडे हजारो रुपये जादा पैशाच्या लोभापायी  गुंतविलेले आहेत. काही महिलांनी तर बचतगटाचे कर्ज घेऊन या महाठक महिलेकडे पैसे दिलेले आहेत. अनेक महिलांनी घरातील व्यक्तींना न सांगताच या वृद्धेस पैसे दिले आहेत. पाच-सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. मात्र दोन दिवसांपासून घेतलेले पैसे देण्यास या वृद्धेकडून टाळाटाळ होऊ लागली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या मोहाला बळी पडलेल्यांनी  नेवासा पोलिस ठाण्यात धाव घेतली. 
तसेच या महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केलेले आहे. ही महिला ज्या कुटुंबाकडे राहात होती त्या कुटुंबासह या महिलेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. आता पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. या महिलेला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

गमतीदार किस्से अन् चर्चा! 

जास्त पैसे मिळविण्याच्या लोभापायी अनेक जणांनी पैसे गुंतविले. मात्र इज्जत जाईल या भीतीपोटी कोणी उघडपणे बोलत नाही. परंतु त्याने इतके  दिले, याने तितके दिले, त्याला इतके मिळाले व त्याचा फायदा आणि याचा तोटा झाला, असे गंमतीदार किस्से नागरिक, महिला एकमेकांना हसून सांगत आहेत. 

 

Tags : Nevasa, Nevasa news, crime, elderly woman, cheated,


  •