Wed, May 22, 2019 17:00होमपेज › Ahamadnagar › ‘त्या’ स्फोटकांचा तपास गुलदस्त्यात

‘त्या’ स्फोटकांचा तपास गुलदस्त्यात

Published On: May 12 2018 1:23AM | Last Updated: May 11 2018 11:37PMराहुरी : प्रतिनिधी

तालुक्यातील बारागाव नांदूर येथील कुख्यात माळी बंधूंच्या घरातून हस्तगत केलेली स्फोटके प्रकरणी पुढील तपास अद्यापि गुलदस्त्यात आहे. दरम्यान, श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी ती स्फोटके माळी बंधूंची नव्हती. तसेच त्याचा वापर मासेमारीसाठी केला जात असल्याने ते प्रयोगशाळेत पाठविले नाहीत, अशी स्पष्टोक्ती दिली. मात्र, मुळा धरण सुरक्षेच्या दृष्टिने अशा स्फोटकांचा वापर गंभीर गुन्हा असूनही पोलिसांनी हा स्फोटकांचा साठा शोधण्यासाठी अजूनही पुरेशी तत्परता दाखविलेली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

बारागाव नांदूर येथील कुख्यात तीनही माळी बंधूंना जिल्हा पोलिस प्रमुखांनी तडीपार केल्यानंतर त्यांच्या घरी पोलिसांनी छापा टाकला असता तेथे स्फोटके सापडल्याचे निर्शनास आले होते. दरम्यान, नेमकी ही स्फोटके कोणती होती? ती कुठून आणली? त्याचा वापर काय? इत्यादी प्रश्‍नांचा उलगडा तपासात होण्याची अपेक्षा होती. मात्र, आठवडा उलटला तरी याबाबत समाधानकारक तपास झाला नसल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिस उपअधीक्षक वाकचौरे यांनी सांगितले की, बारागाव नांदूर येथून हस्तगत केलेली स्फोटके ही कोणती होती ते माहिती नाही. मात्र, ती माळी बंधूंची नव्हती. तसेच ती त्यांच्या घरातून ताब्यात घेतले नव्हते, तर त्यांच्या घराच्या मागील बाजूला ती पोलिसांना आढळून आली होती. याविषयी शेजारी चौकशी केली असता ती माळी बंधूंची नव्हती. असेच समोर आले. या स्फोटकांचा मुळा धरणात मासेमारीसाठी वापर केला जात असल्याचेही समजले. या भागात मासेमारीसाठी अशी स्फोटके सर्रास वापरले जात असल्याची माहिती तपासात मिळाली. त्यामुळे संबंधित स्फोटके पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठविण्याची गरज वाटली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुळा धरणात जिलेटिन सदृश स्फोटकांचा वापर धोकादायक असताना, तसेच पोलिसांना बारागाव नांदूर परिसरात मासेमारीसाठी या स्फोटकांचा वापर होत असल्याची माहिती मिळूनही याप्रकरणाचा तपास थंडावल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून परिसरात असलेला साठा जप्त करावा, तसेच त्याची पाळेमुळे नष्ट करावीत, अशी मागणी होत आहे. 

उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांचे घूमजाव ? 

श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी बारागाव नांदूर येथील माळी बंधूंना अटक करण्यासाठी त्यांच्या घरावर पथकासह छापा टाकला होता. त्यावेळी आरोपी सापडले नसले तरी कोणत्याही परिस्थितीत त्यांना अटक करण्याची त्यांनी भीष्मप्रतिज्ञा केली होती. याशिवाय माळी बंधूंच्या घरात सापडलेल्या पदाथार्ंची तपासणी केली जाणार असल्याचेही पत्रकारांना सांगितले होते. दरम्यान, काल त्यांच्याशी  याप्रकरणी चर्चा केली असता संबंधित स्फोटके हे माळी बंधुंच्या घरात सापडलेच नाही, तर ते घराच्या मागे सापडल्याचे असे घुमजाव केल्याने याविषयी आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.