Mon, May 20, 2019 10:06होमपेज › Ahamadnagar › ‘त्या’ खुनांचा लागेना तपास!

‘त्या’ खुनांचा लागेना तपास!

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 08 2018 10:07PMकर्जत : गणेश जेवरे

कर्जत तालुक्यामध्ये माहिजळगांव शिवारामध्ये मागील महिन्यात एका अनोळखी व्यक्तीचा निर्घूणपणे खून करून नंतर मृतदेहावर ज्वलनशिल पदार्थ टाकून जाळून टाकण्यात आला होता. यामुळे मयताचा केवळ हाडांचा सापळा राहिला होता, मात्र, यामध्ये गळ्यामध्ये एक दोरी तेवढी राहिली होती. याचा अर्थ त्या व्यक्तीचा खून करण्यापूर्वी त्याचा गळा त्या दोरीने आवळण्यात आला होता. शरीरावर राहिलेली दोरीच काय तो अंतिम पुरावा तपासासाठी शिल्लक राहिला होता. मात्र, सुतावरून खुन्यांचा शोध लावण्यात एक महिना झाला तरी पोलिसांना शोध लावता आलेला नाही. 

कर्जत तालुक्यामध्ये गुन्हेगारी घटनांचे प्रमाण (क्राईम रेषो) अतिशय कमी आहे. यामध्ये पोलिसांच्या कामगिरीचा वाटा काही प्रमाणात आहे, हे मान्य करावे लागणार आहे. मात्र, टेक्निकल गुन्हे मात्र पोलिस रोखण्यात अपयशी ठरत आहेत असे असले तरीही ज्या काही गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडल्या आहेत. यामधील आरोपींची किंवा त्या गुन्ह्याची उकल करण्यात येथील पोलिसांना अपयश आले आहे आणि ही बाब तशी गंभीर आहे.

कर्जत तालुक्यात मागील वर्षी दूरगांव येथे एक महिला आणि तीन लहान मुलांचा अशाच प्रकारे निर्घुण पणे खून करण्यात आला होता आणि नंतर मृतदेह अंगावर अ‍ॅसिड टाकून जाळण्यात आले होते. त्या गुन्ह्याचा तत्कालीन पोलिस निरीक्षक वसंत भोये यांनी तपास  करूनही त्यांना आरोपी आणि मयत यांची ओळख पटवता आली नाही. तसाच काहीसा प्रकार माहीजळगांव येथे घडला आहे. या घटनेला  एक महिना झाला आहे मात्र यामध्ये पण आरोपीं किंवा मयताचा शोध लागला नाही. पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी तपास लावण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यांना एक महिना झाला तरी यामध्ये अद्यााप यश आलेले नाही.

तपासाची दिशा चुकत आहे का?

कर्जत पोलिसांनी दोन्ही घटनांमध्ये तपास करताना यामध्ये तपासाची दिशा नेमकी योग्य ठेवली का? बर्‍याच वेळा गुन्हा करणारा हा नेहमी आपण यामध्ये सापडणार नाही अशीच काळजी घेत असतो. असे असतानाही त्याचेकडून काहीतरी चूकही होते आणि त्याच आधारे तपास लावता येवू शकतो मग या दोन्ही घटनांमध्ये गुन्हेगारांनी अशी कोणतीच चूक केला नाही का असे होणार नाह. गळ्यामध्ये असलेली दोरी किंवा इतरही बाबी यामध्ये महत्वाच्या आहेत आणि निर्घुणपणे खून होतो ही बाब जास्त संवेदनशील घेण्याची गरज आहे. 

फॉरेन्सिकचा उपयोग नेमका काय

अशा घटनानंतर फॉरेन्सिक लॅबसाठी शरीरातील काही भाग पाठवला जातो. त्यांचा अहवाल पोलिसांना मिळतो, मात्र त्या अहवालामध्ये जी माहिती मिळते, यावरून पोलिसांना त्यांच्या तपासाची दिशा ठरविता येत नाही का? मयत व्यक्ती किती तासापूर्वी  मयत झाली यासह अनेक बाबी समोर येतात. यावरून तपास अधिकारी काही तरी ठोकताळे नक्कीच बांधू शकतात मग याचा वापर करण्याची गरज आहे 

अजूनही वेळ गेलेली नाही

दूरगांव व माहीजळगांव येथील अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषन विभाग किंवा सीआयडी यांचेकडे देण्यात यावा. कारण अशा घटनांचे शोध हे लागलेच पाहिजेत. कारण जर तसे झाले नाही तर चुकीचा समज समाजामध्ये जावू शकतो आणि त्याचे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.