Mon, Apr 22, 2019 04:17होमपेज › Ahamadnagar › निरीक्षकाला गंडविणारा इसारवाडे अटकेत

निरीक्षकाला गंडविणारा इसारवाडे अटकेत

Published On: Aug 25 2018 1:12AM | Last Updated: Aug 25 2018 1:12AMनगर : प्रतिनिधी

महिलेची 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात फरार आरोपी शिवसंग्रामचा तालुकाध्यक्ष नवनाथ हरिश्‍चंद्र इसारवाडे (रा. गदेवाडी, ता. शेवगाव) याला गुरुवारी (दि. 23) रात्री अटक करण्यात आली आहे. इसारवाडे याने आ. विनायक मेटे यांचा खोटा आवाज काढून पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांनाही सव्वासहा लाख रुपयांना गंडविले होते.  अटक केलेल्या इसारवाडे याला शुक्रवारी शेवगाव येथील न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध फसवणुकीचे चार व पोलिस निरीक्षकाच्या चोरीचा एक असे एकूण 5 गुन्हे दाखल होते. या पाचही गुन्ह्यांत तो फरार होता. 

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, इसारवाडे याने राधाबाई दादासाहेब गोरडे (रा. चापडगाव, ता. नेवासा) यांना जमीनीची खरेदी करून देतो, अशी बतावणी करून त्यांची 15 लाख रुपयांची 20 गुंठे जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. ही बाब उघड झाल्यानंतर सदर महिलेने इसारवाडे याच्याकडे पैसे मागितले. त्याने महिलेच्या कानाला पिस्तूल लावून पैसे मागितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत राधाबाई गोरडे यांच्या फिर्यादीवरून इसारवाडे याच्याविरुद्ध 17 ऑगस्ट 2018 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

इसारवाडे याने त्यापूर्वी शेवगाव पोलिस ठाण्याचे तत्कालिन निरीक्षक गोविंद ओमासे यांना 6 लाख 20 हजार रुपयांना गंडविले होते. एका व्यक्तीच्या खोट्या आवाजास ओमासे हे बळी पडले होते. या गुन्ह्यानंतर ओमासे यांनी त्यांचा सरकारी गणवेश चोरी गेल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यातही इसारवाडे याला आरोपी करण्यात आलेले आहे. त्याच्याविरुद्ध अविश्‍वास ठराव बारगळण्यासाठी एका महिला सरपंचाचा मुलगा व युवतीला बँकेत नोकरीचे आमिष दाखवून फसविले होते. 

अवघ्या काही दिवसांत इसारवाडे याच्याविरुद्ध 5 गुन्हे दाखल होते. त्या गुन्ह्यांत तो फरार होता. नवनाथ इसारवाडे हा गदेवाडी येथील त्याच्या राहत्या घरी आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना समजली होती. त्यावरून पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे, कर्मचारी सोन्याबापू नाणेकर, कर्मचारी रवींद्र कर्डिले, मनोज गोसावी, संतोष लोंढे, दत्ता गव्हाणे, दिगंबर कारखेले आदींच्या पथकाने गुरुवारी रात्री इसारवाडे याच्या घरावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. 

अटक केलेल्या इसारवाडे याला शुक्रवारी (दि. 24) शेवगाव येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 7 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गुठ्ठे हे करीत आहेत.