Fri, Jul 19, 2019 19:51होमपेज › Ahamadnagar › ‘सीआयडी’चे महानिरीक्षक नगरमध्ये

‘सीआयडी’चे महानिरीक्षक नगरमध्ये

Published On: May 26 2018 1:49AM | Last Updated: May 25 2018 10:22PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील रामानंद हे काल (दि. 25) नगरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी सुवर्णनगर येथील घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पोलिस विश्रामगृहावर अधिकार्‍यांची बैठक घेऊन तपासाचा आढावा घेतला.‘सीआयडी’ने केडगाव हत्याकांडाचा तपास सुरू केला आहे. गुन्हा राजकीय स्वरुपाचा व गंभीर असल्याने ‘सीआयडी’चे आयजी रामानंद हे सीआयडीच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसमवेत शुक्रवारी नगरला दाखल झाले आहेत. त्यांनी स्थानिक पोलिस अधिकार्‍यांसमवेत केडगाव येथे जाऊन पाहणी केली. नेमका गुन्हा कसा घडला, याची सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्यासह ‘एसआयटीती’ल अधिकार्‍यांकडून घटनेची माहिती घेतली.

तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्याकडून आतापर्यंत गुन्ह्यात नेमका काय-काय तपास केला, आणखी कोणाचा सहभाग निष्पन्न होत आहे, हे जाणून घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची आढावा बैठक सुरू होती.या गुन्ह्यात आतापर्यंत राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, रवी खोल्लम, बाबासाहेब केदार, संदीप गिर्‍हे, बी. एम. ऊर्फ भानुदास महादेव कोतकर, बाळासाहेब एकनाथ कोतकर, नगरसेवक विशाल कोतकर, भानुदास एकनाथ कोतकर यांना अटक करण्यात आलेली आहे. इतर अनेक आरोपी फरार असून, त्यांच्याविरुद्ध स्टँडिंग वॉरंट जारी करण्यात आले आहे.