Fri, Mar 22, 2019 05:32
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › ...जेव्हा नगराध्यक्ष परीक्षा केंद्रात पोहचतात!

...जेव्हा नगराध्यक्ष परीक्षा केंद्रात पोहचतात!

Published On: Mar 01 2018 1:46AM | Last Updated: Feb 28 2018 11:58PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

बारावीचा पहिला पेपर सुरू, विद्यार्थी पेपर सोडवण्यात व्यस्त.  अचानक नगराध्यक्ष थेट परीक्षा कक्षात सिनेस्टाईल एन्ट्री करून परिक्षार्थ्यांची तपासणी करतात अन अनपेक्षितपणे विद्यार्थ्यांच्या कॉप्या पकडून शिक्षक-विद्यार्थ्यांना चांगलेच सुनावतात, असा शिक्षक, विद्यार्थी आणि पालकवर्गालाही अचंबित करणार प्रकार नुकताच देवळाली प्रवरा येथे घडला.

येथील छत्रपती विद्यालयात 12 वीची परीक्षा सुरू आहे. विद्याथ्यार्ंंना परीक्षेच्या पहिल्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी नगराध्यक्ष सत्यजित कदम व उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे हे गेले असता त्यांना कॉपी करतांना काही विद्यार्थी आढळून आले. त्यामुळे  त्यांनी थेट परीक्षा हॉलमध्ये जाऊन पाहणी केली असता, बारावीच्या भौतिकशास्राच्या पेपरला व वाणिज्य शाखेच्या पेपरला काही विद्यार्थी कॉपी करताना त्यांनी रंगेहाथ पकडले. त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा नंबर घेऊन दरडावले. या प्रकाराबद्दल नगराध्यक्षांनी शिक्षकांनाही चांगलेच धारेवर धरले. 

दरम्यान, नगराध्यक्षांच्या या प्रकारावर काही नागरिकांनी आक्षेप घेतल्याची चर्चा आहे. 12 वीची बोर्डाची परीक्षा सुरू असताना संबधित पर्यवेक्षक, भरारी पथक या व्यतिरिक्त कुणीही परीक्षा कक्षात प्रवेश करत नाही. मात्र नगराध्यक्षांना वर्गात प्रवेश करून दिलास कसा, तसेच त्यांना कॉफ्या पकडण्याचा अधिकार कुणी दिला ? याविषयी देवळालीत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय हेव्यादाव्यातून कॉप्या पकडल्याचीही काहींची भावना असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी काही पालक व नागरिक शिक्षण उपसंचालकांचे लक्ष वेधणार आहेत. विशेष म्हणजे यात काही शिक्षकांनीही तक्रारी केल्याची चर्चा आहे.

... हे तर माझे कर्तव्य : सत्यजित कदम

12 वीची परीक्षा सुरु असताना मी विद्यालयात गेलो होतो. त्यावेळी काही विद्यार्थी कॉफी करत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यामुळे मी त्या विद्यार्थ्यांच्या कॉफ्या पकडून दिल्या. त्या विद्यार्थ्यांची नावे मी संबधित शिक्षकांकडे दिली आहेत. वर्गात जावून विद्यार्थ्यांच्या कॉफ्या पकडून देणे हे लोकप्रतिनिधी या नात्याने मी माझे कर्तव्य समजतो, असे देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले.

सखोल चौकशी करणार  : शिक्षणाधिकारी

परीक्षा सुरू असताना भरारी पथक कर्मचारी, चीफकंडक्टर, पर्यवेक्षक  वगळता  अन्य व्यक्तिला परीक्षा केंद्रात प्रवेश करता येत नाही. दक्षता कमेटी फक्त शाळेच्या बाहेर लक्ष ठेवू शकते. मात्र जर कुणी अशाप्रकारे परीक्षा केंद्रात जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी करत असेल तर संबधित चिफकंडक्टरशी बोलून या घटनेची माहिती पडताळून पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हा शिक्षणाधिकारी कोल्हे यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.