Thu, Aug 22, 2019 14:53होमपेज › Ahamadnagar › टाकळी ढोकेश्‍वर छावणीची झाडाझडती

टाकळी ढोकेश्‍वर छावणीची झाडाझडती

Published On: May 16 2019 2:03AM | Last Updated: May 16 2019 2:03AM
टाकळी ढोकेश्‍वर : वार्ताहर

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत येथे चालू असलेल्या जनावरांच्या छावणीची अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी झाडाझडती घेतली. यावेळी जनावरांच्या संख्येत तफावत आढळून आली असून, स्टॉक रजिस्टर मिळाले नाही. अपूर्ततेची माहिती जिल्हाधिकार्‍यांना देणार असल्याचे तहसीलदार कांबळे यांनी सांगितले. 

उपविभागीय अधिकार्‍यांच्या पत्रानुसार पारनेर बाजार समितीला टाकळी  ढोकेश्‍वर येथे अनुदानावर चारा छावणी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याबाबत अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत. जे छावणी चालक या अटी व शर्तीचे उल्लंघन करतील त्यांना दंड, प्रशासकीय कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले असल्याचे तहसीलदार कांबळे यांनी सांगितले.

कांबळे यांनी शेतकर्‍यांबरोबर चर्चा करून जनावरांचा चारा किती प्रमाणात मिळतो, पशुवैद्यकीय अधिकारी येतात का? चारा वेळेवर मिळतो का? जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी आहे, यावर चर्चा केली.  शेतकर्‍यांनी छावणीचालकांकडून सर्व सुविधा चांगल्या प्रकारे मिळतात. फक्त पशुवैधकीय अधिकारी येत नसल्याचे गार्‍हाणे मांडले.            

चारा बिल नोंदणीत तफावत

तपासणी अहवाल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सुपूदर्र् करण्यात येणार असून तपासणीत स्टॉक रजिस्टर आढळून आले नाही. तसेच चारा बिल नोंदणीत तफावत आढळून आली आहे. इतर माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही.ही सर्व माहिती तुम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडून घेऊ शकता, असे तहसीलदार  मुकेश कांबळे यांनी सांगितले.

सामाजिक जाणिवेतून चारा छावणी : झावरे

स्टॉक रजिस्टर हे पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत होते, तर जनावरे मोजताना त्यांच्याकडून 10 ऐवजी 6 ऐकण्यात गेल्याने 25 जनावरांची तफावत दिसून आली. आम्ही स्वत: परत त्यांना सर्व जनावरे मोजून दिल्यानंतर त्यात 6 जनावरे उलट जास्त निघाली असल्याचे बाजार समितीचे उपसभापती विलास झावरे यांनी सांगितले.