Wed, Mar 20, 2019 12:46होमपेज › Ahamadnagar › चौकशी अहवाल आयुक्‍तांकडे!

चौकशी अहवाल आयुक्‍तांकडे!

Published On: Jan 11 2018 1:04AM | Last Updated: Jan 10 2018 10:21PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

द्विसदस्यीय समितीमार्फत करण्यात आलेल्या पथदिवे घोटाळ्याच्या चौकशी अहवाल काल (दि.10) सायंकाळी महापालिका आयुक्‍तांकडे सादर करण्यात आला आहे. प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रे, बजेट रजिस्टर, जबाब, संगणक तपासणी, प्रत्यक्ष पाहणी आदी मुद्द्यांवर काढण्यात आलेले निष्कर्ष व शिफारसी या गोपनीय अहवालात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पारदर्शक आणि सखोल तपासणी करण्यात आल्याचा दावा चौकशी समितीकडून करण्यात आला आहे. 

40 लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर त्याच्या चौकशीसाठी अतिरिक्‍त आयुक्‍त विलास वालगुडे व नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक संतोष धोंगडे यांच्या समितीची नियुक्‍ती आयुक्‍तांनी केली होती. पथदिव्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी, बजेट रजिस्टरची तपासणी, उपलब्ध असलेल्या प्रस्तावांसह त्यावर स्वाक्षर्‍या असलेल्या अधिकार्‍यांचे जबाब, प्रभाग 1 व 28 मधील नगरसेवकांचे जबाब, नागरिकांचे अभिप्राय, मनपाच्या सर्व विभागांमधील संगणकांमध्ये असलेल्या माहितीची तपासणी समितीकडून करण्यात आली. चौकशीसाठी आयुक्‍तांनी दिलेली मुदत मंगळवारी (दि.9) संपुष्टात आल्यानंतर अहवाल तयार करण्याचे काम सुरु झाले होते. त्यानंतर चौकशीतील निष्कर्ष व शिफारसींसह काल समितीने आयुक्‍त कार्यालयात अहवाल सादर केला आहे.

संपूर्ण शहराचे लक्ष लागलेल्या या प्रकरणाच्या चौकशीत नेमके काय सिध्द होणार, याबाबत नगरकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे. काल आयुक्‍तांकडे अहवाल सादर झाल्यामुळे लवकरच या प्रकरणातील सत्य जनतेसमोर येण्याची चिन्हे आहेत.