Mon, Mar 25, 2019 02:49
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › शिक्षक बदल्यांच्या प्रक्रियेची चौकशी सुरु

शिक्षक बदल्यांच्या प्रक्रियेची चौकशी सुरु

Published On: Jun 06 2018 1:41AM | Last Updated: Jun 05 2018 11:34PMनगर : प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या शिक्षकांच्या वर्ग 1 व वर्ग 2 च्या बदल्यांच्या प्रक्रियेची चौकशी शिक्षण विभागाने सुरु केली आहे. ऑनलाईन पद्धतीने माहिती भरलेल्या शिक्षकांच्या माहितीची तपासणी करण्याचे निर्देश शिक्षणाधिकार्‍यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे.बदल्यांच्या प्रक्रियेत विस्थापित झालेल्या शिक्षकांनी खोटी माहिती भरून बदली झालेल्या 100 शिक्षकांची यादीच शिक्षणाधिकार्‍यांकडे देत चौकशीची मागणी केली होती. तसेच एका संघटनेने संपूर्ण बदल्यांची प्रक्रियाच संशयास्पद असल्याचे सांगत संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याचीही मागणी केली होती. 

नुकतेच जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकाच्या ऑनलाईन पद्धतीने बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप शिक्षक संघटना, विस्थापित शिक्षकांमधून करण्यात येत आहे. या बदल्यांमध्ये जिल्ह्यातील 620 शिक्षक विस्थापित झाले असून, हे शिक्षक दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. अनेकांनी न्यायालयात जाण्याचीही तयारी सुरु केली आहे.जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत संवर्ग 1 व 2 या बदली प्रक्रियेत बहुतांश शिक्षकांनी चुकीची माहिती, खोटी कागदपत्रे सादर करत बदलीचा लाभ घेतला. त्यामुळे अनेक शिक्षक विस्थापित झाले असून, त्यांच्यावर अन्याय झाला आहे. यामुळे अर्जातील शाळा मिळण्याची संधी गेली असून, अर्जातील शाळा न मिळाल्याने गैरसोय झाली झाल्याचा आरोप होत आहे.

चुकीची माहिती आढळल्यास कारवाई

एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरलेली असल्यास संबंधित शिक्षकाची ऑनलाईन बदली एनआयसी च्या माध्यमातून रद्द करण्यात येणार आहे. त्या शिक्षकाच्या रिक्त झालेल्या जागेवर विस्थापित शिक्षकांना नेमणूक देण्यात येईल. सर्व जागा भरल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर या चुकीची माहिती देणार्‍या शिक्षकांना टाकण्यात येईल. तसेच या शिक्षकांना पुढील पाच वर्षे बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.