होमपेज › Ahamadnagar › नगर : सहाय्यक आयुक्तांना फासली शाई(व्‍हिडिओ)

नगर : सहाय्यक आयुक्तांना फासली शाई(व्‍हिडिओ)

Published On: Dec 02 2017 3:45PM | Last Updated: Dec 02 2017 3:50PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

शोषित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याने तसेच सूरज दुर्गीष्ट या विद्यार्थ्यास वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील शिष्यवृत्ती न मिळाल्याने चर्मकार उठाव संघाच्यावतीने कार्यकर्त्यांनी सहाय्यक समाजकल्याण आयुक्त पांडुरंग वाबळे यांना शाई फासली. यासंदर्भात पांडुरंग गिताराम वाबळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

अटक केलेल्या आरोपींमध्ये अशोक नाथा कानडे, प्रकाश पोटे, लखन साळे, विजय घासे यांचा समावेश आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बोल्हेगाव येथील जिल्हा समाज कल्याण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु होते. त्यावेळी काही संतप्त आंदोलकांनी निवेदन स्विकारण्यासाठी आलेल्या वाबळे यांच्या अंगावर शाई ओतून काळे फासले. घटना कळल्यानंतर एमआयडीसी पोलिस घटनास्थळी पोहोचले.

या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे, राष्ट्रीय सचिव विजय घासे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, गौतम सातपुते, बाळासाहेब भोसले, रावसाहेब कानडे, माणिकराव नवसुपे, संतोष कानडे, प्रकाश पोटे, विनोद सिंह, रामेश्‍वर उदे आदि सहभागी झाले होते.

मागासवर्गीय कुटुंबातील सुरज दुर्गीष्ट (रा. तरवडी, ता.नेवासा) या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याचे आई वडिल मोलमजुरी करुन जीवन जगत असून, या हलाखीच्या परिस्थितीत त्यांना मुलाच्या शिक्षण खर्च उचलणे कठिण झाले आहे. सुरजच्या बारावी नंतर आय.आय.टी. घारवाड (कर्नाटक) नंबर लागला असता गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणी करुन त्याला पुढील शिक्षणासाठी पाठविले. या विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती मिळावी यासाठी संघाच्यावतीने समाज कल्याण कार्यालयास वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. 
दिड वर्षात समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने त्याला एक रुपयाची देखील मदत मिळाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. आर्थिक परिस्थिती अभावी मुलास शिक्षण देता येत नसल्याने त्याचे वडिल शंकर दुर्गीष्ट यांनी आत्मदहनाचा इशारा दिला असून, आंदोलना स्थळी त्यांनी रॉकेलची बाटली देखील आणली होती.