Wed, Jun 26, 2019 18:06होमपेज › Ahamadnagar › जातपंचायतीच्या वादातून अमानुष मारहाण

जातपंचायतीच्या वादातून अमानुष मारहाण

Published On: Jul 12 2018 1:39AM | Last Updated: Jul 12 2018 1:39AMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

जातपंचायतीचे चित्रीकरण करीत असल्याच्या कारणावरुन पेटलेल्या वादातून सुमारे 200 ते 250 जणांच्या जमावाने तलवारी, गज, काठ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. त्यातील 8 जणांची प्रकृती अतिशय गंभीर असून, त्यांच्यावर नगरमध्ये उपचार सुरू आहेत. मारहाणीचा प्रकार इतका अमानुष होता, की मारहाण करणार्‍यांनी दोन मुलींना अक्षरश: विवस्त्र करुन मारले.या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

श्रीगोंदा कारखान्यावर काल (दि. 11) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तिरुमली नंदी समाजाची जातपंचायत भरली होती. जिल्ह्याबाहेरून आलेल्या दोनशे ते अडीचशे लोकांनी त्यांच्याच समाजातील जातपंचायतीमधून बाहेर काढलेल्या लोकांना जातपंचायतीचे चित्रीकरण केल्याच्या कारणावरुन मारहाण केली.  जखमींमध्ये मुली, महिलांचाही समावेश आहे. यातील 8 जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे. 

याबाबत माहिती अशी की, श्रीगोंदा कारखान्यावर काल तिरुमली नंदीवाले समाजातील लोकांची जातपंचायत भरली होती. कारखान्यावरील ज्या कुटुंबांना जातीमधून बाहेर काढले, त्यातील काही महिला त्यांच्या घरांमधून ही जात पंचायत पहात होत्या. एक जण जातपंचायत सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन या जातपंचायतीचे चित्रीकरण करीत होता. त्याचा राग आल्यामुळे ‘तू शूटिंग का काढतोस’, असा जाब विचारत जातपंचायतीमधील लोकांनी त्या मुलाला मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण करणारे लोक बीड, पुणे जिल्ह्यातील ओझर, धामणगाव या ठिकाणचे होते. या दोनशे ते अडीचशे लोकांनी कारखान्यावरील तिरुमली नंदी समाजातील वस्तीवर हल्ला करत तलवार, लोखंडी गज, दगडाने मारहाण करायला सुरुवात केली.

मारहाणीत जखमी झालेल्या काही लोकांच्या हात, पाय, डोक्याला गंभीर जखम झाली आहे. या घटनेबाबत माहिती देऊनही पोलिस उशीरा पोहोचल्याची तक्रार महिलांनी केली. जातपंचायत सुरू असल्याबाबत दुपारीच श्रीगोंदा पोलिसांना माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली नसल्यामुळेच एवढी मोठी घटना घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर कदाचित ही मारहाण टळली असती असा गंभीर आरोप मारहाण झालेल्या महिलांनी पत्रकारांशी बोलताना केला. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव व पोलिस पथकाने जखमीना उपचारासाठी नगर येथे पाठविले. 

या हल्ल्यात व्यंकट बाबुराव काकडे, उत्तम बाबुराव काकडे, रामदास गंगाराम मले, गंगाराम हनुमंत पालवे, भाऊसाहेब गंगाराम पालवे, कान्हू बाबु गायकवाड, बाबाजी कान्हू गायकवाड, रमा गायकवाड, सोनाली गायकवाड, शालन गोविंद पालवे, रावसाहेब पालवे, सुरेश भीमा पालवे, सुभाष काकडे, बायडाबाई फुलमाळी, साहेबराव काकडे, अशोक पालवे, अलका मले हे जखमी झाले आहेत. या सर्व जखमीवर श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले. यातील 8 जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयातून तलवार जप्त 

दोन गटाच्या जमावात तलवार, गज व इतर धारदार शस्त्र वापरली गेल्याचे समोर आले आहे. या गुह्यात वापरली गेलेली तलवार एकाने ग्रामीण रुग्णालयात आणली होती. याच तलवारीने आम्हाला मारहाण झाल्याचे त्याने सांगितले.