होमपेज › Ahamadnagar › मराठा कर्मचार्‍यांची माहिती द्या

मराठा कर्मचार्‍यांची माहिती द्या

Published On: Apr 07 2018 1:41AM | Last Updated: Apr 07 2018 12:38AMनगर : प्रतिनिधी

राज्यातील मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य मागासवर्गीय आयोगाच्या निर्देशानुसार महापालिकेतील मराठा समाजाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची माहिती शासनाकडून मागविण्यात आली आहे. सरळसेवा व पदोन्नत्तीने कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांच्या सेवा पुस्तकातील नोंदींनुसार ही माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेश गुरुवारी (दि.5) नगरविकास विभागाने महापालिकेला दिले आहेत. 

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण तसेच शासन सेवेत मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व किती आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाने सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका आणि महामंडळांच्या अधिपत्त्याखालील राज्यातील सर्व कार्यालयांमधील मराठा समाजाच्या कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांची माहिती शासनाकडून मागविली आहे. सामान्य प्रशासन विभागाने 26 मार्च रोजी शासनाच्या सर्व विभागांना याबाबतची माहिती 15 एप्रिलपर्यंत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या पार्श्‍वभूमीवर नगरविकास विभागाने महापालिका आयुक्‍तांना पत्र पाठवून मनपात कार्यरत असलेल्या मराठा समाजाच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एकूण मंजूर पदे, खुल्या प्रवर्गातील मंजूर पदे, सरळसेवा व पदोन्नत्तीने कार्यरत असलेली खुल्या प्रवर्गातील पदे, खुल्या प्रवर्गातील कार्यरत अधिकारी, कर्मचार्‍यांपैकी मराठा समाजातील कार्यरत अधिकारी, कर्मचारी अशी माहिती शासनाने मागविली आहे. मागासवर्गीय आयोगाकडे 15 एप्रिलपर्यंत ही माहिती सादर करावयाची असल्याने  कर्मचारी, अधिकार्‍यांच्या सेवा पुस्तकांमध्ये खातरजमा करुन तात्काळ माहिती सादर करावी, अशा सूचना शासनाने महापालिकेला दिल्या आहेत.

 

Tags : Ahmednagar, Ahmednagar news, municipal corporation, Maratha community, Information,