Sat, Apr 20, 2019 16:39होमपेज › Ahamadnagar › ४६ हजार हेक्टरवर बोंडअळीचा प्रादुर्भाव

४६ हजार हेक्टरवर बोंडअळीचा प्रादुर्भाव

Published On: Jan 19 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 10:50PMनगर : प्रतिनिधी

बोंडअळीच्या प्रादुर्भावाचा जिल्ह्यातील 46 हजार हेक्टरवरील कपाशीला फटका बसल्याचा अंदाज कृषी विभागाने काढला आहे. यात 791 गावातील 66 हजार शेतकरी बाधित झाल्याने शासनाकडून मिळणार्‍या आर्थिक मदतीकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

यावर्षी बीटी बियाणांची लागवड केलेल्या कापसाच्या पिकावर राज्यभरात ठिकठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. आधीच अस्मानी, सुलतानी संकटांना तोंड देत असलेला बळीराजा यामुळे पुन्हा आर्थिक संकटात सापडला. बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाने 10 डिसेंबरपासून पंचनामे सुरु केले होते. ते अद्यापही सुरूच आहेत. कृषी अधिकरी, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकामार्फत बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे सुरु आहेत.

पंचनामे करतांना संबंधित शेतातील अक्षांश, रेखांशासह पंचनामे करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे 10 डिसेंबर सुरु असलेले पंचनामे महिनाभरानंतरही चालूच आहेत. प्रत्येक शेतकर्‍याच्या शेतात जाऊन थेट पंचनामे करावे लागत आहेत. ग्रामीण भागात खत, बियाणे, औषध दुकानदाराकडून अनेक शेतकर्‍यांनी उसनवारीवर खरेदी केलेली असते. पीक विकल्यावर त्या दुकानदाराचे पैसे शेतकर्‍याला द्यायचे असतात. आता हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकर्‍यांवर जणू आभाळच कोसळल्यासारखी परिस्थिती झाली आहे.

एका हेक्टर क्षेत्रात सरासरी 10 ते 11 क्विंटल कापूस होतो. राज्यात अनेक ठिकाणी पहिल्या वेचणीलाच शेतकर्‍यांना बोंडअळीमुळे नुकसान सोसावे लागले. नगर जिल्ह्यात मात्र बोंडअळीचा प्रादुर्भाव उशिराने झाला. नगर जिल्ह्यातल्या बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना दुसर्‍या व तिसर्‍या वेचणीला नुकसान सोसावे लागले. जिल्ह्यात हेक्टरमागे सरासरी दोन क्विंटलचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. 

पहिल्या वेचणीला चांगले पीक हाताशी आल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान  काही प्रमाणात कमी झाले आहे. याचा अहवाल कृषी विभागाने राज्य सरकारला पाठविला असून, शासनाकडून आर्थिक मदत लवकरात लवकर देण्याची मागणी होत आहे.