Fri, Apr 26, 2019 03:10होमपेज › Ahamadnagar › जीएसटीमुळे उद्योग धोक्यात

जीएसटीमुळे उद्योग धोक्यात

Published On: Jan 13 2018 1:10AM | Last Updated: Jan 12 2018 11:35PM

बुकमार्क करा
श्रीरामपूर : प्रतिनिधी

कर प्रणाली सोपी कशी करता येईल, या जाणिवेतून वस्तू व सेवा कर (जीएसटी) अस्तित्त्वात आला. या देशातील गरीब देखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर भरतात. गरीबाला देखील करातून सूट नाही हे लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक राज्याला स्वतःची करप्रणाली ठेवण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. 86 टक्के पैसा हा फॉर्मल इकॉनॉमीने ओढून घेतला आहे. विकसित देशामध्ये फॉर्मल इकॉनॉमी आहे. तिथे  छोट्या उद्योगाला महत्त्व नाही. जीएसटी मुळे छोट्या उद्योगधंद्याचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सचिव डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले.

प्रवरा ग्रामीण संस्थेच्या येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाच्यावतीने ‘वस्तू व सेवा कराचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम’ या विषयावर आयोजित दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक अ‍ॅड. अप्पासाहेब दिघे होते. यावेळी संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, प्रवरा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अशोक असावा, संभाजी देवकर, बाबासाहेब दळे, सुरेश पानसरे, प्राचार्य डॉ. एस. आर. वाळुंज, उपप्राचार्य डॉ. आर. जी. रसाळ व उपस्थित होते. 

डॉ. कानगो म्हणाले की, देशामधील विदेशी गुंतवणूक महत्त्वाची आहे,  पण शेतीतील गुंतवणूक कमी झालेली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेतीला झालेला आहे. जीएसटीचा परिणाम शेतीवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. भारतीय शेतीकडे दुर्लक्ष झाल्याचे विचारात घेतले पाहिजे. जो शेतकरी पूर्वी बियाण घरीच तयार करीत होता त्याने घरी शेतकरी बियाणं तयार करण्याचे बंद केले आहे. इंफॉर्मल इकॉनॉमिला मागे टाकण्याचा प्रयत्न होत आहे. फॉर्मल इकॉनॉमी जिंकली आहे. नोट बंदीच फटका सर्वसामान्य व लघुउद्योगांना बसला आहे. 

भारतातील सर्वच घटकावर जीएसटीचा परिणाम झाला आहे. देशभर एकच कर प्रणाली असावी, हा हेतु चांगला आहे पण त्याची फलश्रुती निरुतरीत आहे. फॉर्मल इकॉनॉमी चे महत्त्व वाढणं म्हणजे प्रगती आहे का? कार्पोरेट जगाला सर्व बँका ताब्यात घ्यायच्या आहेत.  बँका अडचणीत येतील. फॉर्मल धंदा वाढला आहे. बदललेल्या अर्थव्यवस्थेत जीएसटी ला महत्त्व असले, तरी विना रोजगार विकास आणि शेतकरी आत्महत्या करताना दिसत आहेत. जीएसटीचा अभ्यास एकांगी न करता सर्वांगीण होणे गरजेचे आहे, सर्वसामान्य जनतेवर त्याचा किती परिणाम होईल याचा अभ्यास चर्चासत्रात अपेक्षित आहे. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रस्ताविक डॉ. एस. आर. वाळूंज यांनी केले. डॉ. जी. आर. देशमुख यांनी चर्चासत्राची भूमिका मांडली. सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा विखे व  प्रा. पी. बी. विखे यांनी केले. डॉ. व्ही. ए. खर्डे यांनी आभार मानले.