Fri, Sep 21, 2018 02:03



होमपेज › Ahamadnagar › कळसूबाई शिखरावर फडकणार तिरंगा

कळसूबाई शिखरावर फडकणार तिरंगा

Published On: Aug 12 2018 1:00AM | Last Updated: Aug 11 2018 11:47PM



अकोले : प्रतिनिधी

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व त्यांच्या 360 एक्सप्लोर ग्रुपद्वारे कळसुबाईवर सर्वात मोठा तिरंगा फडकावून विश्वविक्रम होणार आहे. याच बरोबरीने एव्हरेस्ट वीर आनंद बनसोडे यांच्या हस्ते भंडारदरा टुरिझमच्या लोगोचही अनावरण होणार असल्याची माहिती भंडारदरा टुरिझमचे अध्यक्ष विजया व रवी ठोंबाडे यांनी दिली.

संपूर्ण भारत देशाला लोकप्रिय असणारा तिरंगा हा आता कळसूबाई शिखरावर डौलाने फडकताना दिसणार आहे. कळसूबाई शिखर हे समुद्रसपाटीपासून  1646 उंची असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून गिर्यारोहकांना कळसूबाई शिखर कायम आव्हान  देत उभे आहे. 15ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून व निसर्ग पर्यटन व ट्रेकिंग यासाठी प्रेरणा मिळावी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 360 एक्सप्लोररचे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी भारताच्या स्वातंत्रदिनी एक आगळी वेगळी मोहीम आखली असून कळसूबाई शिखरावर भारताचा सर्वात मोठा तिरंगा नेऊन जागतिक विश्वविक्रम करणार आहेत.

या झेंड्याची उंची 12 फूट आणी 62 मीटर असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या मोहिमेत शेकडो लोक सामील होणार असून भारताच्या व महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण असणार आहे. याचबरोबर भंडारदरा टुरीझम या बेवसाईडचा लोगोचे अनावरण ही कळसूबाई शिखरावर पार पडणार असल्याने पर्यटक व अकोलेवासियांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे अकोले माझाचे  सर्वेसर्वा रवी ठोंबाडे व विजया पाडेकर यांनी सांगितले. अनेकांना या मोहिमेत सामील होण्यासाठी नुकतेच भंडारदरा टुरिझमचे रवी ठोंबाडे यांनी आवाहन केले आहे. 

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररच्या माध्यमातून जगभर मोहिमा करत असतात. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी जगातील 4 खंडातील 4 सर्वोच्च शिखरांवर चढाई करून भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्यांनी  5 पुस्तके लिहिली असून जगभर कॉर्पोरेट ट्रेनिंग व स्पीकर म्हणून लोकांना ते मार्गदर्शन देत असतात. एव्हरेस्टविर आनंद बनसोडे व त्यांची 360 एक्सप्लोरर टीम पहाटे पाच वाजता कळसूबाई शिखर चढाईसाठी सुरूवात करणार असून त्यांच्या जागतिक विश्वविक्रम करण्याच्या या उपक्रमात महाराष्ट्रातून अनेक पर्यटक, ट्रेकर  यावेळी हजेरी लावतील असा अंदाज आहे. यामुळे अकोले तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी कळसूबाई शिखर चढाई आखून हजारो लोकांना त्यांनी आतापर्यंत अकोले तालुक्यातील सौंदर्य दाखवले आहे. 15 ऑगस्ट रोजी रवी ठोंबाडे यांच्या भंडारदरा टुरिझमचे उद्घाटन होणार असून याद्वारे अकोले तालुक्याची महती जगभर जाण्यास मदत होणार आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व रवी ठोंबाडे यांनी अकोल्याचे सौंदर्य जगभर कळण्यासाठी ही मोहीम हाती घेतली असून यातून अनेक स्थानिकांना रोजगार मिळेल, असा विश्वास रवी ठोंबाडे व आनंद बनसोडे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राचे भूषण असलेले एव्हरेस्ट वीर आनंद बनसोडे यांच्या हस्ते भंडारदरा टुरिझम या पर्यटनास चालना देणार्‍या ग्रुपचा लोगो व वेबसाईट महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखरावर कळसूबाईवर भारताचा ध्वज फडकावत प्रदर्शित करण्यात येणार आहे. आनंद बनसोडे यांनी आजपर्यंत गिर्यारोहक म्हणून जगभरात विविध ठिकाणी आपली ओळख निर्माण केलेली आहे. त्यामुळे आनंद बनसोडे यांच्याच हस्ते या भंडारदरा टुरीझमचा लोगो प्रदर्शित करावा, अशी अनेक मान्यवरांची अपेक्षा होती.