Sat, Feb 23, 2019 22:22होमपेज › Ahamadnagar › साईनगरीत वाढती गुन्हेगारी!

साईनगरीत वाढती गुन्हेगारी!

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 09 2018 1:35AMशिर्डी : प्रतिनिधी

धार्मिक क्षेत्रात नंबर एकचे तीर्थक्षेत्र म्हणून साईनगरीची आगेकूच होत असताना साईंच्या या नगरीकडे आता आंतरराष्ट्रीय स्थळ म्हणून पाहिले जात आहे. अशा या साईनगरीला अवैध धंद्यांनी चांगलाच फास आवळला आहे. या व्यावसायिकांना राजकीय क्षेत्रातील युवराजांचे अभय मिळत असल्याने व शिर्डी पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे साईनगरीचा धार्मिक वारसा कमी होत असून तो गुन्हेनगारीकडे झुकताना दिसत आहे. 

शिर्डीत बाबांच्या हयातीपूर्वी अधर्माचे राज्य होते. जातीपातीच्या मोठ्या भिंती होत्या. त्यासाठी बाबांनी शिर्डी गावात येऊन त्या अनिष्ट बाबी नष्ट करून या गावचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर अशा पावनभूमीला मिळालेला पवित्र वारसा पुढे नेण्यासाठी विशेष जबाबदारीची यंत्रणा काळाच्या ओघात निर्माण झाली. त्या यंत्रणेने शिर्डी शहर आपली मक्तेदारी असल्यासारखे पोलिस आपल्या पदाचा गैरवापर करून अर्थपूर्ण गरजा भागवत आहे. मात्र, यामुळे अवैध व्यावसायिकांचे चांगलेच फावले. एखाद्या अधिकार्‍याने कर्तव्यनिष्ठ म्हणून कारवाई केली तर तो व्यावसायिक राजकीय युवराजांना सांगून दबाव तंत्र निर्माण केले जाते. अशा यंत्रणेचा सामान्य नागरिक व साईभक्तांना एज्युकेटेड क्राईमचा त्रास होताना दिसत आहे. आज वास्तविक पाहता शिर्डीत राजरोसपणे सुरू असलेले दारू, मटका, जुगार अड्डे, अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. पोलिस, अवैध व्यावसायिक आणि त्यांच्या दलालांच्या लागेबांध्यामुळे अवैध धंदे बोकाळले आहेत. नाशिक, औरंगाबाद शहराजवळ असलेली शिर्डी हे पर्यटकांचे नवे आकर्षण ठरली आहे. मात्र पर्यटननगरी भोवती अवैध धंद्यांचा फास आवळला दिसून येत आहे.

शिर्डी पोलिसांच्या कार्यक्षेत्रात भर नागरी वस्तीसह कालिकानगर, कोतेगल्ली, पालखी रस्ता, भीमनगर, संतनगर, हेलिपॅड रोड, निघोज आदी भागात खुलेआम अवैध गावठी दारू, मटका, जुगार अड्डे सुरू आहेत. अशा धंद्यामुळे नागरीवस्तीत पुन्हा उपद्रव मूल्य वाढत आहे. स्थानिक पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असताना पोलिस कारवाईत कुचराई होत असल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे. चरस, गांजा, कोकेन, म्याव-म्याव यांच्यासह विविध अंमली पदार्थाची येथे विक्री केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. काही स्थानिकांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या  तडजोडीमुळे गुंडांकडून स्थानिकांना मारहाण झाल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत.