Sun, May 26, 2019 00:38होमपेज › Ahamadnagar › आ. जगतापांच्या कोठडीत वाढ

आ. जगतापांच्या कोठडीत वाढ

Published On: Apr 13 2018 1:12AM | Last Updated: Apr 12 2018 11:27PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात गुरुवारी पोलिस कोठडीची मुदत संपलेल्या आरोपी राष्ट्रवादीचे आ. संग्राम अरुण जगताप यांच्यासह चौघांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तसेच गावठी कट्टा पुरविणार्‍या बाबासाहेब केदार यालाही चार दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. या आरोपींना काल (दि. 12) दुपारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले होते.

आ. जगताप, संदीप रायचंद गुंजाळ, बाळासाहेब कोतकर, भानुदास ऊर्फ बी. एम. कोतकर यांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपत होती. तसेच गावठी कट्टा पुरविणार्‍या बाबासाहेब केदार याला बुधवारी अटक करण्यात आली आहे. पोलिस कोठडी संपलेले चार जण व अटक केलेला केदार अशा पाच जणांना दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार व सरकारी वकील अ‍ॅड. सीमा देशपांडे हे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी करताना म्हणाले की, आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. गुंजाळ हा स्वतःहून पोलिसांत हजर होऊनही सर्व पुरावे देत नाही. मोबाईल हॅण्डसेट व सीमकार्ड नष्ट करून दिले. एक गावठी कट्टा टाकून दिला होता.

यातून या गुन्ह्यात प्रत्यक्ष हल्लखोरच नव्हे, तर अनेकांचा कटात सहभाग असल्याचे दिसून येते. दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आलेले आहेत. आरोपी गुंजाळ याने गुन्ह्याचा घटनाक्रम पोलिसांना सांगितलेला आहे. मात्र, कटात आणखी कोण आहे, हे अजून उघड झालेले नाही. राजकीय वादातून हा खून झालेला असल्याने गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन सखोल तपास करणे आवश्यक आहे. गुंजाळ याचा मोबाईल हस्तगत करणे आहे, फरार आरोपींना अटक करायची आहे. गुन्ह्याचे स्वरुप गंभीर असून, आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी.

आरोपीच्या वकिलांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. आ. संग्राम जगताप यांचे नाव राजकीय वादातून गोवलेले आहे. त्यांच्याबाबत रिमांड रिपार्टमध्ये पोलिस कोठडीसाठी कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. त्यामुळे जगताप यांना कोठडी देण्यात येऊ नये. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पाचही आरोपींना सोमवारपर्यंत (दि. 16) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.


मारहाणीची तक्रार गुंजाळकडून मागे

न्यायालयासमोर हजर केल्यानंतर आरोपी संदीप गुंजाळ याने न्यायालयाकडे पोलिसांनी कोठडीत असताना मारहाण केल्याची तक्रार केली. तक्रारीनंतर त्याने रडल्यासारखेही केले. न्यायालयाने पोलिस व आरोपीच्या वकिलांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले. थोड्या वेळानंतर आरोपीने न्यायालयात लेखी म्हणणे दिले की, मला पोलिस कोठडी नको होती. म्हणून न्यायालयाकडे मारहाणीबाबतची खोटी तक्रार केली.

विशाल कोतकरनेच मारण्यास सांगितले

नगरसेवक विशाल कोतकर यानेच फोनवरून संदीप गुंजाळ, संदीप गिर्‍हे, महावीर मोकळ व आणखी एकास संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांना जिवे मारण्यास सांगितले होते. कोतकर याच्या मोबाईल कॉल डिटेल्स तपासून आरोपींकडे चौकशी करायची आहे, असे तपासी अधिकारी दिलीप पवार यांनी न्यायालयात सांगितले.

Tags : Ahamadnagar, Increase, custody, MLA Jagtap