होमपेज › Ahamadnagar › आ. जगतापांच्या कोठडीत वाढ

आ. जगतापांच्या कोठडीत वाढ

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 16 2018 11:55PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्यासह तिघांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची, तर दोघांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. गुन्ह्याचे स्वरुप गंभीर स्वरुपाचे असल्याने न्यायालयाने पोलिस कोठडीत वाढ केल्याचे आदेशात म्हटले आहे.केडगाव हत्याकांडातील पाच आरोपींची पोलिस कोठडी संपत असल्याने त्यांना काल (दि. 16) दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सरकारी पक्षाच्यावतीने तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार व सरकारी वकील अ‍ॅड. सीमा देशपांडे यांनी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. ते म्हणाले की, आरोपींनी केलेल्या गुन्ह्याचे स्वरुप गंभीर आहे. संदीप गुंजाळ याने दिलेल्या माहितीवरून संदीप गिर्‍हे व महावीर मोकळे यांना अटक करण्यात आलेली आहे. ते पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्याकडून मिळणारी माहिती गुंजाळ याच्या जबाबाशी सुसंगत आहे का, याची खातरजमा करायची आहे. गुन्ह्यात वापरलेला तलवार, कोयता हस्तगत करायचा आहे. प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी असल्यांचे नाव निष्पन्न करायचे आहे. कटात आणखी कोण-कोण सहभागी याची चौकशी करायची आहे. फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडीत देण्यात यावी.

आरोपीच्या वकिलांनी सरकारी पक्षाच्या मागणीला जोरदार विरोध केला. ते म्हणाले की, आ. जगताप यांच्याविरुद्ध आतापर्यंतच्या तपासात कोणताही पुरावा समोर आलेला नाही. कोणताही पुरावा नसताना आ. जगताप हे तब्बल 8 दिवसांपासून पोलिस कोठडीत आहेत. त्यामुळे आ. जगताप यांना पोलिस कोठडी देण्यात येऊ नये.  दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आ. संग्राम जगताप, भानुदास महादेव ऊर्फ बी. एम. कोतकर, बाळासाहेब कोतकर यांना बुधवारपर्यंत (दि. 18) पोलिस कोठडी सुनावली आहे. संदीप गुंजाळ, बाबासाहेब केदार या दोघांना गुरुवारपर्यंत (दि. 19) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

Tags : Ahmadnagar, Increase, MLA, Jagtap, custody