Sun, Oct 20, 2019 11:38होमपेज › Ahamadnagar › शिर्डीच्या वैभवात साईतीर्थ थिम पार्कची भर !

शिर्डीच्या वैभवात साईतीर्थ थिम पार्कची भर !

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 12:26AMशिर्डी : प्रतिनिधी 

साईबाबांच्या दर्शनानंतर शिर्डीत येणार्‍या भाविकांसाठी अध्यात्मिक केंद्र म्हणून ‘साईतीर्थ’ लवकरच नावारूपाला येणार आहे. मालपाणी समुहाने लोकाभिमुख केलेले कार्य हे शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्राच्या वैभवात निश्चित भर घालणारे असल्याचे गौरवोद्गगार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी काढले.

शिर्डीत आयोजित ‘साईतीर्थ’ या थिम पार्कच्या सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ना. शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील होते. व्यासपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे, खा. दिलीप गांधी, खा.संजय काकडे, आ. स्नेहलता कोल्हे, संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे, नगराध्यक्षा योगिता शेळके, मालपाणी समुहाचे संचालक गिरीश मालपाणी, आशिष मालपाणी आदींसह मान्यवर उपस्थित होते. 

ना. शिंदे म्हणाले की, नगर जिल्ह्याला संतांची परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे हा जिल्हा लवकरच पर्यटन जिल्हा व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ना. विखे म्हणाले की, ‘साईतीर्थ’ हे अध्यात्मिक केंद्र दिशादर्शक ठरणार आहे. हे केंद्र उभारण्यासाठी शिर्डीची निवड मालपाणी समुहाने केल्याने लोकप्रतिनिधी म्हणून मला आनंद आहे. या निर्मितीमुळे शिर्डीच्या विकासात हा एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.  जिल्ह्यात अनेक तीर्थक्षत्रे असल्याने हा जिल्हा लवकरच पर्यटन तीर्थक्षेत्र असणारा जिल्हा घोषित करण्यात यावा. शिर्डीसारख्या तीर्थक्षेत्रस्थळी असे थिमपार्क हे विकासाला चालना देणार असल्याचे ना.विखे म्हणाले. मालपाणी समुहाची यशोगाथा मांडताना समुहाचे संचालक राजेश मालपाणी म्हणाले की, कोणताही प्रकल्प यशस्वी करताना आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे. तो प्रकल्प समाजाभिमुख करण्यासाठी प्रयत्न हवेत. त्याच जोरावर मालपाणी समूह  राज्याबाहेरही लौकिक प्राप्त करीत आहे. प्रास्ताविक मनीष मालपाणी यांनी केले. 

मालपाणींच्या माध्यमातून नव राजकीय नेतृत्व

संगमनेर शहराबरोबरच राज्यातही मालपाणी समुहाने प्रत्येक क्षेत्रातच आपली प्रगती साधली आहे. या माध्यमातून त्यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी पाहता संगमनेरमधून नवे राजकीय नेतृत्व उभे राहत असल्याचा मला मनस्वी आनंद असल्याची प्रतिक्रिया ना. राधाकृष्ण विखे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिली आहे. तसेच मालपाणींनी राजकारणात यावे आणि या क्षेत्रात प्रगतीच्या अतिउच्च शिखरावर जावे असे मत ना.विखे यांनी व्यक्त केले आहे.

 

Tags : Shirdi, Shirdi news, Them Park, Inauguration,