Sun, Jul 21, 2019 16:15
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › ऑनलाईन प्रणाली कागदापुरती नको : ना.विखे

ऑनलाईन प्रणाली कागदापुरती नको : ना.विखे

Published On: Jan 22 2018 1:26AM | Last Updated: Jan 21 2018 10:38PMराहुरी : प्रतिनिधी 

राज्यात ऑनलाईन प्रणाली केवळ कागदापुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्षात अंमलात आणली, तरच त्याचा सर्वसामान्यांना लाभ होईल, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले. 

राहुरी खुर्द येथील नूतन ग्रामपंचायत कार्यालय व आरोग्य केंद्र उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. उपाध्यक्षा राजश्री घुले होत्या. व्यासपीठावर आ. शिवाजीराव कर्डिले, जि. प. अध्यक्षा शालिनी विखे, तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, जि. प. सदस्य शिवाजीराव गाडे, चाचा तनपुरे, नामदेवराव ढोकणे आदी उपस्थित होते.

ना. विखे म्हणाले,  राहुरी तालुका शासकीय प्रकल्पांमुळे बाधित झाला आहे. राज्य सरकारकडून सर्वांधिक मदत राहुरी तालुक्याला मिळणे गरजेचे आहे.  तसेच राहुरी येथे उड्डाणपुलाची उभारणी करून नगर व शनिशिंगणापूरकडे जाणार्‍या प्रशस्त रस्त्यांची निर्मिती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून राहुरीचे झालेले दोन भाग एकत्र आणण्यासाठीही पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करताना आ. कर्डिले यांच्या माध्यमातून तनपुरे कारखाना सुरू झाल्याने आवर्जून सांगितले.

आ. कर्डिले यांनी महिला बचत गटांसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून मुद्रा योजनेचे कर्ज वाटपाचे आश्‍वासन दिले.  तसेच प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्तांचा प्रश्‍न मार्गी लावणार असल्याचे सांगत भागडा चारी समस्या कायमस्वरूपी सोडविणार असल्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी जि. प. अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, शिवाजीराव गाडे यांनी मनोगत व्यक्त केले.  प्रास्ताविक नंदू डोळस, सूत्रसंचालन सरपंच सचिन शेटे, तर आभार उपसरपंच बाबासाहेब शेडगे यांनी मानले.