Wed, May 22, 2019 14:44होमपेज › Ahamadnagar › फूट पाडण्यासाठी जनतेतून सरपंच 

फूट पाडण्यासाठी जनतेतून सरपंच 

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 23 2018 1:19AMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

भाजपा सरकारने जनतेतून सरपंचपदाची निवड करण्याचा घेतलेल्या निर्णय हा गावाच्या भल्यासाठी नव्हे, तर गावातील जनतेत उभी फूट पाडण्यासाठी घेतला आहे. जनतेत फूट पाडून आपला स्वार्थ साधणे हेच, जनतेतून सरपंच निवडीचे खरे इंगीत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांनी केला.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या जनसेवा फाउंडेशनच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करीत विखे परिवाराने नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. अध्यक्षस्थानी आ. राहुल जगताप होते.ना. विखे पाटील पुढे म्हणाले, की सरकार व्यक्तीद्वेषातून वागत आहे. छगन भुजबळ यांचा थेट संबंध नसताना त्यांना गुंतवले आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी करताना दुजाभाव केला आहे. दोन कोटी नोकर्‍या देण्याचे तरुणांना आश्वासन दिले. पण दोन लाख तरुणांना नोकर्‍या दिल्या का, असा सवाल केला.

आ. जगताप म्हणाले, डॉ. सुजय विखे हे मेंदूचे डॉक्टर आहेत. काम करणारांना संधी मिळते म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांची एकत्रीत निवडणूक लढविण्यासाठी बैठक होईल. या बैठकीत योग्य भूमिका मांडणार आहे. 

डॉ. सुजय विखे म्हणाले, जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेत कुणाला गाडीत कुठे बसवायचे, कुणाला गाडीतून कुठे खाली उतरायचे, हे आम्हाला चांगले माहीत आहे. त्यामुळे अण्णासाहेब शेलार तुम्ही काळजी करू नका. आ. जगताप व आमच्या परिवराचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे आ. जगताप यांना ही जागा  सोडण्यासाठी तुमच्या नेत्यांशी बोलून घ्या. मला तालुक्याच्या राजकारणात रस नाही. संधी देणारा तालुका आहे म्हणून कामाची सुरूवात श्रीगोंद्यातून करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी अण्णासाहेब शेलार भगवानराव पाचपुते दत्तात्रय पानसरे केशव मगर  बाळासाहेब गिरमकर सुभाष डांगे हेमंत ओगले यांची भाषणे झाली

यावेळी बाळासाहेब नाहाटा, अनिल ठवाळ, प्रशांत दरेकर, हरिदास शिर्के, वृक्षमित्र आबासाहेब मोरे, विठ्ठल काकडे, सुनील सूर्यवंशी, सचिन कोकाटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष रोडे केले.

जुगाड टेक्नॉलॉजी येथे प्रसिद्ध : ना. विखे 

श्रीगोंद्यात एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र येतात. श्रीगोंद्याची जुगाड टेक्नॉलॉजी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. श्रीगोंदेकरांनी विखे परिवारावर खूप प्रेम केले आहे. म्हणून जनसेवा फाउंडेशनचे पहिले कार्यालय श्रीगोंद्यात उघडले आहे.  दोन्ही काँग्रेस नेत्यांची एकत्रीत निवडणुका लढण्यावर बैठक होणार आहे. निश्चितच सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.