नगर : प्रतिनिधी
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने चार वर्ष पूर्ण केली आहेत. या चार वर्षाच्या काळात मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले. नरेंद्र मोदींनी चार वर्षात निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदींनी आणि भाजपने देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. याचा निषेध करत आज काँग्रेसतर्फे विश्वासघात दिन पाळण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी दिली.पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाणे, संपत म्हस्के, उबेद शेख, बाळासाहेब भुजबळ, गौरव ढोणे, किरण पाटील, अजय रक्ताटे, सचिन गुजर, प्रशांत दरेकर, शामराव वाघस्कर, मयूर पाटोळे, योगेश दिवाणे आदी उपस्थित होते.
चार वर्षापूर्वी मोदींनी लोकांना भरपूर स्वप्ने दाखवली. आश्वासने दिली. जनतेनेही त्यांना मोठ्या प्रमाणावर मते दिली. सत्तेवर आल्यावर आपल्या आशा आकांक्षा, दिलेली आश्वासने मोदी पूर्ण करतील अशी अपेक्षा लोकांना होती. मात्र मोदींनी देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. हे चार वर्षाच्या भाजपच्या सत्ताकाळानंतर आता स्पष्ट झाले आहे.त्यामुळे आज दिल्लीगेट येथे काँग्रेस कार्यकर्ते काळ्या फिती लावून काळे झेंडे दाखवत जनजागृती करणार आहेत.
प्रत्येक वर्षी देशाची आर्थिक, सामाजिक स्थिती खालावत असताना केंद्रातील आणि विविध राज्यातील भाजपची सरकारे जनतेच्या पैशांवर हजारो कोटींच्या जाहिराती देऊन उत्सव साजरा करत आहेत. हा नेमका कसला उत्सव आहे? देशातल्या सामन्य माणसाला उध्दवस्त केल्याचा? सीमेवर शहीद होणार्या सैनिकांच्या मरणांचा? की देशातल्या 45 हजार शेतकरी आत्महत्यांचा? असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला.
दररोज राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ केला जात आहे. पाकिस्तानचे सैनिक आपल्या जवानांचे शीर धडापासून वेगळे करून घेऊन जात आहेत मोदीजी मात्र गप्प आहेत. चीनने डोकलाम गिळंकृत केला, मोदीजी गप्प आहेत. नक्षलवादी दररोज आपल्या सैनिकांच्या हत्या करित आहेत पण सरकार मूकदर्शक बनली आहे. पाकिस्तानी दहशतवादी रोज हल्ले करत आहेत मात्र मोदीजी पाकिस्तानात जाऊन जेवणावळी झोडत आहेत हा ‘विश्वासघात’ नाही तर काय आहे? मोदींनी चार वर्षात देशातल्या जनतेचा विश्वासघात केला आहे.