Thu, Apr 25, 2019 15:39होमपेज › Ahamadnagar › आगीत सख्ख्या भावांचे संसार पडले उघड्यावर

आगीत सख्ख्या भावांचे संसार पडले उघड्यावर

Published On: May 17 2018 1:37AM | Last Updated: May 17 2018 12:09AMधानोरे : वार्ताहर

राहुरी तालुक्यातील निंभेरे येथील कापुरआई फाट्यानजीक राहत असलेल्या संपत गंगाधर शिंदे व कानिफनाथ गंगाधर शिंदे या दोन सख्या भावांची घरे अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाली. यात घरात लावलेल्या दुचाकीसह घरातील सर्व संसारउपयोगी वस्तु खाक झाल्या.निंभेरे येथील संपत गंगाधर शिंदे व कानिफनाथ गंगाधर शिंदे हे दोन भाऊ आपल्या कुटूंबासमवेत कानडगाव-कापुरआई फाट्याजवळ दोन स्वतंत्र छपराच्या घरात राहतात. अतिशय गरीब हे कुटूंब असून मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालवितात. काल नेहमी प्रमाणे या दोनही कुटुंबातील व्यक्ती मोलमजुरीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. घरी फक्त मुलेच होती. अचानक दुपारी तीन वाजेच्या सुमारास या दोनही छपराच्या घरांनी पेट घेतल्याचे संपत शिंदे यांची मुलगी सुनिता हिच्या लक्षात आले. परंतु घरी कोणीही नसल्याने 11 वर्षीय सुनिताने मोठमोठ्याने आरोळ्या ठोकत शेजारील लोकांना बोलावले. तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते.

यावेळी या घरांमध्ये असलेली सुमारे 40 हजार रुपये किंमतीची हिरो पॅशन दुचाकी गाडी, घरातील धान्य, कपाट, एक सायकल व घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या दोन्ही घरात असणार्‍या गॅस टाक्यांचा मात्र या आगीत स्फोट झाला नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना टळली. तसेच यावेळी येथील राजुनाना डुक्रे, आयुब शेख, आण्णासाहेब धोंडे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु रखरखत्या उन्हात आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. या आगीत शिंदे कुटूंबियांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून संध्याकाळी उशिरापर्यंत कामगार तलाठी पंचनामा करीत होते.