Sun, Nov 18, 2018 19:48होमपेज › Ahamadnagar › फूस लावून पळविलेली मुलगी पालकांच्या ताब्यात

फूस लावून पळविलेली मुलगी पालकांच्या ताब्यात

Published On: Dec 15 2017 2:42AM | Last Updated: Dec 14 2017 11:05PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

मध्यप्रदेशातून फूस लावून पळवून आणलेली 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी नगरच्या रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांना आढळून आली. मुलीची विचारपूस करून तिच्या पालकांशी पोलिसांनी संपर्क साधला. मध्यप्रदेशातील पोलिस व मुलीचे पालक नगरला आल्यानंतर मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, येथील लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस डी. दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल अरुण टिंगरे, उमेश कोंगे, संजय लांडगे, ज्ञानेश्वर झेंडे हे रेल्वे स्टेशन परिसरात ऑपरेशन मुस्कान अंतर्गत गस्त करत होते. सायंकाळच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी एकटीच बसलेली त्यांना दिसली.

या 15 वर्षीय मुलीकडे चौकशी केली असता ती मध्यप्रदेश राज्यातील भुतेडा ता. जावरा, जिल्हा रतलाम येथील असल्याचे समजले. मुलीने दिलेल्या फोन नंबरवर विचारणा केली असता, मुलीला फूस लावून पळवून नेल्याबाबत जावरा औद्योगिक क्षेत्र येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे सांगितले.

त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी जावरा पोलिसांशी संपर्क साधून खातरजमा केली. तसेच मुलीला घेऊन जाण्यासाठी पालकांसह बोलावून घेतले. तोपर्यंत येथील मुलामुलींच्या निरीक्षण गृहात तात्पुरत्या निवार्‍यासाठी मुलीला ठेवण्यात आले. दुसर्‍या दिवशी जावरा येथील पोलिस कर्मचारी व मुलीचे पालक नगरला आल्यानंतर मुलीला पोलिस व पालकांच्या ताब्यात देण्यात आले.