Mon, Jun 24, 2019 17:11होमपेज › Ahamadnagar › मनपा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व कायम

मनपा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व कायम

Published On: Apr 08 2018 2:03AM | Last Updated: Apr 08 2018 2:03AMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथील ‘प्रभाग 32 ब’च्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारत आपले वर्चस्व कायम ठेवले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विशाल कोतकर यांनी 2340 मते मिळवत, प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार विजय पठारे यांचा 454 मतांनी पराभव केला. दरम्यान, शिवसेनेशी घटस्फोट घेत स्वबळावर रिंगणात उतरलेल्या भाजपाचा या निवडणुकीत अक्षरशः धुव्वा उडाला.

माजी महापौर संदीप कोतकर यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्यामुळे रिक्‍त झालेल्या या जागेवर शुक्रवारी (दि.6) पोटनिवडणूक घेण्यात आली. या जागेसाठी तब्बल 75 टक्के मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती सूर्यवंशी, सहाय्यक निडणूक अधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत काल (दि.7) सकाळी जुन्या महापालिकेत मतमोजणी पार पडली. यात कोतकर यांना सर्वाधिक 2340 मते मिळाली. तर सर्व शक्‍ती पणाला लावून निवडणुकीत चुरस निर्माण करणार्‍या शिवसेना उमेदवार पठारे यांना 1886 मतांवर समाधान मानावे लागले. स्वबळावर निवडणुकीत उतरलेल्या भाजपावर मात्र डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली. भाजप उमेदवार महेश सोले यांना केवळ 156 मते मिळाली. तर 50 मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दर्शवून तीनही उमेदवारांना नाकारले. दरम्यान, मतमोजणी नंतर काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत व फटाके फोडून जल्लोष केला. माजी महापौर संदीप कोतकर यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

Tags : Ahmadnagar, bye, election, Congress, dominated