Mon, Apr 22, 2019 05:51होमपेज › Ahamadnagar › उन्हाळ्यातही कर्जत पाणीदार

उन्हाळ्यातही कर्जत पाणीदार

Published On: Apr 23 2018 1:13AM | Last Updated: Apr 23 2018 12:19AMकर्जत : गणेश जेवरे

कर्जत आणि पाणीटंचाई हे समीकरण गेले अनेक पिढ्या होते. आला उन्हाळा टँकर सुरू झाला हे चित्र अनेक वर्षे तालुक्यातील जनता अनुभवत होती. टंचाई आढावा मिटिंग असली की ती हमखास पाणी टंचाई मुळे गाजत असे मात्र या वेळी झालेली आढावा बैठक ही पाणी टंचाई किंवा टँकर यावर चर्चा न होता झाली. हा चमत्कार झाला तो केवळ आणि केवळ जलयुक्त शिवार या योजनेमुळेच. याचे सर्व श्रेय जाते पालकमंत्री राम शिंदे यांना.

कर्जत तालुका हा जिल्ह्यातील क्षेत्रफळाने मोठा तालुका आहे आणि तालुक्यात पर्जन्यमान कमी असते. कारण हा पर्जन्य छायेचा प्रदेशमध्ये येतो.सततचा दुष्काळ आणि पाणी टंचाई येथील नागरिकांच्या पाचवीलाच पुजलेला कर्जत शहराची तर संपूर्ण देशात पाणी नसलेला तालुका अशीच ओळख झाली होती. नळावाटे 12 महिने पाणी टंचाई. पावसाळ्यात 8 दिवसांनी नळाने पाणी येते. तर उन्हाळ्यात 50 दिवस नळाने पाणी आले नाही असा विक्रम झाला आहे.

टंचाईच्या स्वरूपात बदल

कर्जत शहरात पाणी टंचाई अनेक पिढ्या राहिली. याचे कारण, स्वरूप बदलत गेले. सुरुवातीला पाऊस भरपूर येत. नदी, नाले, ओढे ही आठ ते 9 महिने वाहत.यामुळे पाणी टंचाई उन्हाळ्यात जाणवत असे. यावेळी तलावात पाणी असले तरी ते आणण्याची व्यवस्था नव्हती. यामुळे टँकर सुरू करावे लागे. नंतर वितरण व्यवस्था झाली तर पाऊस कमी पडू लागला. त्यात लोकसंख्या वाढत होती. यामुळे तलाव कोरडा पडू लागला की टँकर सुरू करावा लागत असे. 

काही वर्षापूर्वी कर्जत तालुक्यात दुष्काळ पडला होता. सर्वत्र तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होई.चिमणीला पिण्यास पाणी मिळत नव्हते. सर्व तलाव, विहिरी, कोरड्या ठाक पडल्या होत्या. माणसापेक्षा जनावरांना पाणी मिळत नव्हते. या मुळे तालुक्यात 100 टँकर सुरू लागले जाते ते पण कोठे भरावयाचे याचा पण गंभीर प्रश्‍न निर्माण झाला होता.या पाणी टंचाईमुळे कर्जत शहर आणि तालुका या दोन्हीचा विकास थांबला होता. उद्योग सुरू होणे तर दूरच येथे शिक्षण शिवाय काही झाले नाही. अनेक वर्षे विकास थांबून राहिला 

जलयुक्तमुळे संजीवनी

राज्यात सत्ता बदल झाला आणि तसा कर्जत तालुक्यातील जनतेच्या नशीबी. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतत पडणार्‍या दुष्काळाचे निवारण करण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना सुरू केली. यामध्ये कर्जत तालुक्यातील कर्जत शहर आणि इतर 9 असे 10 गावे जलयुक्तमध्ये बसली. या गावात कृषि विभाग यांचे मार्फत ही कामे सुरू केली. गावात पाऊस पडल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात होते. ते थांबवून त्याचा साठा करण्याची गरज होती. यामुळे गावाजवळ असलेले ओढे खोल करणात आले. कर्जत शहराच्या चारी बाजूंनी नदी खोदण्यात आली आणि असेच यावेळी पाऊस जोरदार पडला. यामुळे कर्जत शहरात एवढे पाणी साठले की कर्जत शहर बेटांचे गाव वाटू लागले आणि हे पाणी आज उन्हाळ्यात नदीच्या पात्रात थोडे दिसत आहे.आज कर्जतमध्ये उन्हाळ्यात नदीस पाणी आहे आणि हे चित्र केवळ जल युक्तमुळे दिसून येते 

कर्जत झाले टँकरमुक्त 

यावर्षी कर्जत शहर आणि तालुक्यात उन्हाळ्यात एकही टँकर सुरू करावा लागला नाही. सर्व गावात आज पुरेसे पाणी आहे. कर्जत शहरात पाणी टंचाई नाही. यावेळी पाणी टंचाईवर फारशी चर्चा झाली नाही, हे दुर्मिळ चित्र दिसले. सरपंच यांची टँकर सुरू करा, खेपा वाढवा असे काहीच झाले नाही. यामुळे या वेळी टंचाई बैठक ही कर्जत तालुक्यातील आहे का यावर पण क्षणभर विश्‍वास बसत नव्हता . हे सर्व ‘जल है तो कल है’ यामुळे झाले. पालकमंत्री राम शिंदे यांनी तालुक्यात जलयुक्त शिवार योजना राबवली आणि अजूनही राबवत आहेत. यामुळे दुष्काळी कर्जत ही प्रतिमा पुसून लवकरच पाणीदार कर्जत ही प्रतिमा तयार होईल.