Thu, Aug 22, 2019 08:53होमपेज › Ahamadnagar › हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद

हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 1:32AMनगर : प्रतिनिधी

केडगावात शिवसेनेच्या दोघा पदाधिकार्‍यांची हत्या झाल्याच्या निषेधार्ह जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला शहरासह केडगाव, भिंगार आणि जिल्ह्यातील ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठा व व्यवहार पूर्णतः बंद होते. शहर परिसरातील उपनगरातही बंदला प्रतिसाद मिळाला.

शहरात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी या दुहेरी हत्याकांडाचा निषेध केला. घटनेचा निषेध करत शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यापार्‍यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.  शहरात हत्याकांडाची मोठी घटना घडलेली असल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले. शहरातील काही भागात दुकानदारांनी दुकाने अर्धवट सुरु ठेवली होती. मात्र दुपारी गिर्‍हाईकांअभावी व्यापार्‍यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली.

शहरातील तीनही बसस्थानकांत प्रवाशांची संख्याही रोडवल्याचे दिसून आले. बाहेरगावाहून नगरला येणार्‍या व नगरहून बाहेरगावी जाणार्‍या अनेकांनी प्रवासाचा बेत रद्द केला. चौकाचौकात पोलीस बंदोबस्त असल्याने वाहतूक सुरळीत सुरु होती. बराच कालावधीनंतर शहरात अशी घटना झाल्याने तणावाचे वातावरण होते. त्यामुळे अनेकांची रविवारची सुट्टी बाहेर न जाता घरातच गेली. सोशल मीडियावर शिवसैनिकांच्या हत्येच्या निषेधाच्या तसेच आ. संग्राम जगताप यांना अटक केल्याने त्यांच्या समर्थनार्थ पोस्ट फिरत होत्या.

केडगावात व्यवहार बंद ठेवून घटनेचा निषेध

केडगाव येथे पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येच्या निषेधार्थ काल (दि.8) केडगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे केडगावला पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे.

केडगावच्या प्रभाग क्रमांक 32 च्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होऊन शनिवारी (दि.7) निकाल जाहीर झाला. दुपारी किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडले होते. सायंकाळी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे हे दोघे सुवर्णानगर परिसरात असताना त्यांची गोळ्या झाडून व तलवारीने हत्या करण्यात आली. त्यानंतर संतप्त जमावाने दगडफेक केली होती. रात्री अंबिकानगर बसस्टॉपजवळ रास्ता रोको करण्यात आला. यावेळी दगडफेक झाली. गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री 11 वाजता पंचनाम्यास सुरुवात झाली. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पोलिसांवर आगपाखड केली.

रात्री दीड वाजता पंचनामा पूर्ण झाल्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रविवारी सकाळी ते औरंगाबादमधील घाटी रुग्णालयाकडे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. दरम्यान, दोन शिवसैनिकांची हत्या झाल्यानंतर शनिवारपासून केडगावात तणाव निर्माण झाला होता. रात्री 7 वाजल्यानंतर केडगावातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले. दुसर्‍या दिवशी काल बंद पाळण्यात आला. सर्व व्यवहार बंद असल्याने दिवसभर शुकशुकाट होता. घटनास्थळ, केडगाव वेस, शाहूनगर परिसर, भूषणनगर चौक याठिकाणी मोठा फौजफाटा तैनात होता. तसेच मृत पावलेले संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त होता.

नाशिकचे अतिरिक्त महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी सकाळीच केडगावात फिरून कायदा व सुव्यस्थेचाआढावा घेतला. पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्यासह पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, एसआरपीची एक तुकडी यासह पोलिस कर्मचार्‍यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पेट्रोलपंप, हॉटेल, रुग्णालये बंद असल्याने अनेकांची गैरसोय झाली. घटना घडलेल्या ठिकाणी नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण होते.

कोणीच कोणासोबत बोलत नव्हते. सर्वजण घरात बसून होते. संजय कोतकर यांचा केडगावात फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. ते कट्टर शिवसैनिक होते. त्यांच्या पाठीमागे आई-वडिल, पत्नी, एक मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे. वसंत ठुबे सुरुवातीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गाडे यांच्याकडे चालक म्हणून कार्यरत होते. नंतर त्यांनी टेम्पो, डंपर घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ठुबे यांच्यामागे आई, दोन भाऊ, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे.

 

Tags : Ahmednagar, Ahmednagar news, crime, Shivsena officebearers murder, Kedgaon closed,