होमपेज › Ahamadnagar › अनैतिक संबंधातूनच झाला खून

अनैतिक संबंधातूनच झाला खून

Published On: Mar 13 2018 1:40AM | Last Updated: Mar 13 2018 1:40AMपारनेर/टाकळी ढोकोश्‍वर : प्रतिनिधी    

तालुक्यातील माळवाडी, पळशी येथील सुभाष बाळू दुधवडे या 29 वर्षांच्या तरुणाचा अनैतिक संबंधातील अडथळा दूर करण्यासाठी खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत तपास लावून आरोपींना ताब्यात घेण्याची कामगिरीही पोलिसांनी केली. आरोपींना पारनेर न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांना 19 मार्च पर्यंत पोलिस कोठडी दिली. 

गाजदीपूर शिवारातील काळू धरणाच्या कपारीला शनिवारी दुपारी 29 वर्षीय सुभाष बाळू दुधवडे (रा. माळवाडी, पळशी, ता. पारनेर) या तरुणाचा मृतदेह प्लास्टीकच्या पिशवित आढळून आला होता. 28 फेब्रुवारीपासून सुभाष हा बेपत्‍ता असल्याची खबर त्याच्या भावाने पोलिसांत दिली होती. सुभाष याचा मृतदेह आढळून आल्याने अज्ञात व्यक्‍तीविरोधात पारनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी या प्रकरणात मृत सुभाष याच्या मोबाईलचा तपशील उपलब्ध करून तपास सुरू केला. त्याच्या मोबाईलवर अशोक ऊर्फ भावड्या मोतीराम चिकणे (वय 30, रा. माळवाडी, पळशी) याचा शेवटचा फोन झाला होता. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याचा साथीदार नाना मोहन बर्डे (वय 26, रा. जुना मळा, पळशी) या दोघांनी 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी खडकवाडी येथून सुभाष दुधवडे यास सोबत घेतले. तिघेही मोटारसायकलवरून गाजदीपूरच्या जंगलाकडे गेले. जातानाच सुभाष याचा दोरीने गळा आवळून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो प्लास्टिकच्या पिशवीत भरून काळू  तलावात फेकून दिल्याचे सांगितले. 

आरोपीने दिलेल्या माहितीनुसार अशोक चिकणे व मयत सुभाष दुधवडे याच्या दुसर्‍या पत्नीचे गेल्या काही दिवसांपासून अनैतिक सबंध होते. त्याची कुणकूण सुभाष यास लागल्यानंतर त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. त्याच रोषातून सुभाष यास कामचा संपवून टाकण्यासाठी त्याचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. 

पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहायक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, निरीक्षक हनुमंत गाडे यांच्यासह पो. कॉ. महेश आव्हाड, अरविंद भिंगारदिवे आदींनी या गुन्ह्याचा तपास लावला. 

विविध गुन्ह्याच्या तपासात हातखंडा असलेल्या महेश आव्हाड व अरविंद भिंगारदिवे या दोघा कर्मचार्‍यांनी या गुन्ह्याची उकल करण्यात महत्वाची भूमिका बजावली. फोनच्या संभाषणापेक्षाही स्थानिक खबर्‍यांकडून माहिती मिळविण्यात यश आल्याने 24 तासांत गुन्हाचा तपास पूर्ण होऊन आरोपींना जेरबंदही करण्यात आले.