Wed, Nov 21, 2018 09:15



होमपेज › Ahamadnagar › महसूल आयुक्‍तांकडून होणार चौकशी!

महसूल आयुक्‍तांकडून होणार चौकशी!

Published On: Mar 20 2018 2:25AM | Last Updated: Mar 20 2018 2:25AM



पारनेर : विजय वाघमारे     

देवस्थानचे नाव कमी करून तसेच नवा फेरफार तयार करून, तालुक्यातील ढवळपुरी येथील 137 एकर जमिनीची केलेली बेकायदेशीर विक्री विधानसभेत सोमवारी चांगलीच गाजली. आ. विजय औटींसह 8 आमदारांनी प्रश्‍नांची सरबत्ती करत याप्रकरणी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी झालेल्या व्यवहाराचे फेरफार रोखण्यासह या प्रकरणाची तसेच आ. औटी यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची महसूल आयुक्‍तांकडून 3 महिन्यांत चौकशी करण्याचे आदेश दिले. 

ढवळपुरीतील लक्ष्मीनारायण देव विष्णू मंदिराच्या 137 एकर जमिनीच्या बेकादेशीर विक्रीच्या हालचाली सुरू झाल्यापासून ‘दै. पुढारी’ने त्याविरोधात आवाज उठविला होता. गेल्या चार पिढ्यांपासून 26 कुळे या जमिनी कसत होती. जमिनीची बेकायदेशीर विक्री झाल्यामुळे ही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. तालुक्यातील जमिनींचे भाव गगनाला भिडलेले असताना, अवघ्या 11 कोटींमध्ये तब्बल 137 एकर जमिनीची विक्री करण्यात आली. आ. औटी यांनी काल (दि.19) यासंदर्भात ‘दै. पुढारी’ने प्रसिद्ध केलेल्या बातम्यांची कात्रणे सादर करीत विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला. 

त्यावर उत्तर देताना याप्रकरणी हिंदूराव हारकू चेमटे व इतरांकडून 137 एकर जमीन लाटण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीवर घेण्यात आलेल्या सुनावणीदरम्यान तक्रारदारांनी उपस्थित राहून, त्यांच्या नावाने खोट्या सह्या करून सरकार दरबारी खोटी निवेदने सादर केल्याचा खुलासा केल्याचे उत्तर महसूल मंत्री पाटील यांनी दिले.

 पुणे येथील धर्मदाय आयुक्‍त यांच्या परवानगी आदेशानुसार नोंदणी नियम 1961 नुसार खरेदीखत नोंदविण्यात आल्याचेही मंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितले. या लेखी उत्तरात अतिशय त्रोटक माहिती असल्याने समाधान न झाल्याने आ. औटी यांच्यासह आ. गणतपराव देशमुख, सुधाकर देशमुख, दिलीप वळसे, राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांनी विविध प्रश्‍न उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. 

आ. सुधाकर देशमुख हे बोलत असताना आ. संजय कुुंटे हे वारंवार व्यत्यय आणत होते. त्यावर ‘कुंटे, तुम्ही मंत्री पाटील यांचे वकील आहात का?’, असे देशमुख यांनी त्यांना सुनावले. अखेर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची तसेच आ. औटी यांनी घेतलेल्या आक्षेपांची महसूल आयुक्‍तांकडून तीन महिन्यांत चौकशी करण्याचे आदेश दिले. या विषयावर सभागृहात तब्बल 25 मिनिटे चर्चा झाली.