Thu, Jun 20, 2019 20:42होमपेज › Ahamadnagar › मराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्यास आंदोलन

मराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्यास आंदोलन

Published On: May 05 2018 12:47AM | Last Updated: May 04 2018 11:20PMनगर : प्रतिनिधी

ओबीसी प्रवर्गात मराठा व इतर कोणत्याही प्रगत जातीचा समावेश केल्यास  तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने दिला आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाला देण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने नगरला नुकतीच जनसुनावणी झाली.या जनसुनावणीत दहा हजारांपेक्षा अधिक निवेदने दाखल झाली आहेत. यापूर्वी देखील मराठवाड्यात जनसुनावणी झाली. या दोन्ही ठिकाणच्या जनसुनावणीत मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनाव्दारे केली गेली आहे. या मागणीमुळे ओबीसी समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे. समता परिषदेने  येथील जनसुनावणीत निवेदन दिले. मराठा समाजाने केलेल्या मागणीमुळे ओबीसी प्रवर्गात समावेश असलेल्या जातीत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊन तीव्र असंतोष धुमसत आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या 27 टक्के आरक्षणाला धक्‍का न लावता स्वतंत्र आरक्षण देण्यास  हरकत नसल्याचे समता परिषदेने निवेदनात म्हटले आहे.

मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट केल्यास भारतीय संविधानाच्या सामाजिक न्यायाच्या उदृेशाला हरताळ फासला जाईल.त्यामुळे समावेश करण्यास समता परिषद  तीव्र विरोध करीत असल्याचे निवेदनात म्हटले. यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, विभागीय अध्यक्ष अंबादास गारुडकर, शहराध्यक्ष दत्ता जाधव, किसनराव रासकर, संदीप रासकर, संभाजी अनारसे आदींसह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.