Sun, Jul 21, 2019 08:10होमपेज › Ahamadnagar › बोगस बियाणे सापडल्यास एक लाख दंड

बोगस बियाणे सापडल्यास एक लाख दंड

Published On: Apr 18 2018 1:43AM | Last Updated: Apr 18 2018 12:15AMनगर : प्रतिनिधी

बोगस बियाण्यांमुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असेल, तर ही गंभीर बाब आहे. कंपनी आणि डिलर यांनी शेतकर्‍यांची फसवणूक होणार नाही, असे काम करावे. तालुकास्तरावर तक्रार समित्या स्थापन केल्या आहेत. बोगस बियाण्यांचे पॅकेट सापडल्यास 1 लाख रुपये दंड व 5 वर्षांची कैद होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी दिली.

मागील वर्षी बोंडअळीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले होते. यावर्षी नुकसान होऊ नये या उद्देशाने कृषी विभागाच्यावतीने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे कापूस पिकावरील बोंडअळीचे व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेस आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बर्‍हाटे, विभागीय कृषी सहसंचालक विलास नलगे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, अ.नगर फर्टिलायझर असो.चे अध्यक्ष मुनोत, महाराष्ट्र फर्टिलायझर असो.चे अध्यक्ष अण्णा कवडे, डॉ. कौशिक, रश्मी भोंगे, डॉ. वाघ, कृषी अधिकारी सुनील राठी, विलास गायकवाड आदींसह अधिकारी, कर्मचारी, डिलर्स आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोंडअळी एकात्मिक कीड व्यवस्थापन फलकाचे अनावरणही करण्यात आले.

बर्‍हाटे म्हणाले की, बोंडअळीचा सामूहिकरित्या बंदोबस्त करावा. व्हॉट्सअपचे ग्रुप करून सोशल मीडियाचा वापर करावा. डिलरनेही शेतकर्‍यांना फिल्ड ट्रायल झाल्याशिवाय बियाणे देऊ नये. त्यामुळे शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टळेल. सीएसआर आणि शेतकर्‍यांचा संबंध असू द्या. शेतीशाळा घ्या. त्या शेतीशाळेस कंपनीचा प्रतिनिधी उपलब्ध असायला हवा. बोगस कंपन्यांचे बोर्ड प्रत्येक डिलरने आपल्या दुकानात लावावेत. जेणेकरून शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल. रश्मी भोंगे यांनी बोंड अळीवरील एकात्मिक कीड व्यवस्थापनावर सविस्तर मार्गदर्शन केले.

 

Tags : ahamadnagar, ahamadnagar news, bogus seed, fine,