होमपेज › Ahamadnagar › पैसे देऊन आदर्श ग्रामसेवक पुरस्कार!

पैसे देऊन आदर्श ग्रामसेवक पुरस्कार!

Published On: Jul 20 2018 1:10AM | Last Updated: Jul 19 2018 11:17PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणार्‍या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांमध्ये पैसे घेऊन, आर्थिक देवाणघेवाणीतून पुरस्कारासाठी ग्रामसेवकांची नावे निवडण्यात आली आहेत. बेकायदेशीरपणे इतिवृत्तात बदल करून पुरस्कारास योग्य अशा ग्रामसेवकास वगळण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे सदस्य अनिल कराळे यांनी केला आहे. या प्रकारचा निषेध करत आजच्या पुरस्कार वितरण सोहळ्यावर शिवसेनेचे सदस्य बहिष्कार टाकत असल्याचे ते म्हणाले.

पत्रकार परिषदेस सभापती रामदास भोर उपस्थित होते. 2014-15 व 2015-16 या वर्षातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण आज होणार आहे. ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवडलेल्या ग्रामसेवकांची नावे जिल्हा परिषदेने अखेरच्या दिवसापर्यंत गोपनीय ठेवली होती. मात्र ग्रामसेवकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ही यादी जाहीर होण्याआधीच ‘व्हायरल’ झाली. निवड प्रक्रिया सुरु असतांना ग्रामसेवकांनी आपापल्या परीने ‘सेटिंग’ लावून पुरस्कार मिळविण्याचा प्रयत्न केला. पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी 2 ग्रामसेवक निवडण्यात आले आहेत.

एकूण 28 ग्रामसेवकांपैकी शेवगाव तालुक्यातील ज्ञानदेव विश्वनाथ वीर यांचे नाव घेण्यावरून गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरु होती. काही पदाधिकार्‍यांनी वीर यांच्यासाठी ‘लॉबिंग’ केले. तर शिवसेनेच्या सदस्यांनी शेवगाव तालुक्यातल्या वरखेड येथील ग्रामसेवक राजेंद्र संपत साखरे यांचे नाव पुरस्कारासाठी घेण्याचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. वीर यांचे नाव चुकीच्या पद्धतीने घेण्यात आल्याचा आरोप करत चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची भेट घेण्यात आली. त्याला काही प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेना सदस्यांनी अध्यक्षा शालिनी विखेंकडे तक्रार केली.

अध्यक्षांनी संबंधित अधिकार्‍यांना बोलावून घेत योग्य ग्रामसेवकालाच पुरस्कार देण्याची सूचना केली. मात्र अध्यक्षांच्या सूचनेला फाटा देत वीर यांचे नाव अंतिम करण्यात आले. शिवसेना सदस्यांनी अध्यक्षा विखेंना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, साखरे हे वरखेड येथे काम करत असतांना गावास संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, अस्मिता ग्राम पुरस्कार मिळाला. तसेच ठाकूर पिंपळगाव गाव हागणदारीमुक्त केले. स्मार्टग्राम पुरस्कार मिळाला. तसेच मळगाव व खुंटफळ ही गावेही हागणदारीमुक्त केली. त्यानुसार साखरे यांचा प्रस्ताव आला. मात्र या प्रस्तावात 5 ऑगस्ट 2016 नंतर तीन महिन्यांनी परस्पर बदल करून दुसरे इतिवृत्त सादर करत प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला. दोन इतिवृत्त करणार्‍या पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी व गटविकास अधिकार्‍यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. अधिकार्‍यांना प्रस्तावाची फाईल दाखविण्याची विनंती केली असता फाईल दाखविली जात नाही. त्यामुळे या पुरस्काराच्या निवडीत आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे ते म्हणाले.

6 सदस्य, 2 सभापती राहणार गैरहजर

ग्रामसेवक पुरस्कारावरून जिल्हा परिषदेत वादंग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अंतर्गत सुरु असलेली ही धुसफूस शिवसेनेच्या तक्रारीनंतर बाहेर आली. पुरस्काराच्या निवडीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. विळद घाटात असलेल्या विखे पाटील सभागृहात होणार्‍या या कार्यक्रमाला शिवसेनेचे 6 सदस्य व 2 पंचायत समिती सभापती गैरहजर राहणार आहे