Sun, May 26, 2019 21:10होमपेज › Ahamadnagar › मुंडे साहेबांचा संघर्षाचा वारसा मी चालविणार : धनंजय मुंडे

मुंडे साहेबांचा संघर्षाचा वारसा मी चालविणार : धनंजय मुंडे

Published On: Jun 05 2018 1:15AM | Last Updated: Jun 04 2018 11:37PMजामखेड : प्रतिनिधी

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांच्या जीवनात सर्वसामान्य जनतेसाठी जो संघर्ष केला तो संघर्षाचा वारसा मरेपर्यंत सांभाळून माझा राजकीय प्रवास सुरूच ठेवणार आहे. मला सहा वर्षे खलनायक केले, याबद्दल दुःख वाटते पण मी सामान्य माणसासाठी जीवन वेचत असेल तर खलनायक कसा? त्यांच्या संघर्षात वीस वर्षे सावली सारखा बरोबर राहिलो आहे. त्यांच्या मनात काय आहे ते मी ओळखत होतो. मात्र, मला मनातील भावना कधीच व्यक्त करता आल्या नाहीत, अशी खंत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

जामखेड येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान आयोजित पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. जामखेड येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. यंदाचे हे चौथे वर्ष आहे. सोमवारी(दि.4)  येथील आदित्य मंगल कार्यालयात रक्तदान शिबीर व इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन झाले. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी राऊत, महेंद्र गर्जे, मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, दत्तात्रेय वारे, संजय वराट, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, अमित चिंतामणी, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, शरद शिंदे, विकास राळेभात, महादेव डुचे, लहू डोंगरे आदी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले की, स्व. गोपीनाथ मुंडे गेले यावर अजून विश्वास बसत नाही. गावापासून ते दिल्लीपर्यंतचा प्रवास संघर्षमय आहे. ते गेल्यावर देखील जनमाणसात त्यांचे स्थान आहे. आज मला मुंडे घरातील रक्ताचे समजलात याबद्दल आभारी आहे. मुंडे काय होते ते दाखवून देईल.ते राजकारणा पलीकडचे नेते होते म्हणून ते लोकनेते झाले. 1994 साली संघर्ष यात्रा सामान्यांच्या प्रश्‍नांवर काढली आणि 95 ला त्यांच्यामुळेच सरकार आले. त्यांच्याबरोबर असणारे आज सत्ता भोगत आहेत.

आज आपण महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करताना त्यांनी जातीत बांधू नका. मी विरोधी पक्षाचा राजधर्म पाळत आहे, असे सूचक वक्तव्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे, प्रास्तविक काशीनाथ ओमाशे तर आभार प्रकाश नागरगोजे यांनी केले. यावेळी 155 जणांनी रक्तदान केले .