Sat, Jul 20, 2019 02:39होमपेज › Ahamadnagar › विवाहितेच्या खूनप्रकरणी पती, सासर्‍यास जन्मठेप

विवाहितेच्या खूनप्रकरणी पती, सासर्‍यास जन्मठेप

Published On: May 18 2018 1:13AM | Last Updated: May 17 2018 11:50PMनगर : प्रतिनिधी

‘तू गरीब घरची आहेस’, असे म्हणत किरकोळ भांडणाच्या कारणावरून पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून दिल्याने मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पतीसह माजी सरपंच असलेला सासर्‍यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर माजी सरपंच असलेल्या सासूला न्यायालयाने  सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी काल (दि.17) हा निकाल दिला.

पती नवनाथ शिवाजी काटे, सासरा शिवाजी विठोबा काटे व सासू पार्वतीबाई शिवाजी काटे अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दि. 9 मार्च 2016 रोजी सकाळी 9 च्या सुमारास मयत सारिका नवनाथ काटे (रा. हिवरेझरे, ता. नगर) हिला ‘तू गरीब घरची आहेस’, असे म्हणत किरकोळ भांडणावरून सासरा शिवाजी काटे याने तिच्या अंगावर रॉकेल ओतले. यावेळी तिथे उपस्थित असणार्‍या पती नवनाथ याने सारिकाला पेटवून दिले. याचवेळी सासू पार्वतीबाई ही सारिकास शिवीगाळ करत होती.

पेटवून दिल्याने गंभीर जखमी झालेल्या सारिकाला उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तेथेे सारिका हिचा विशेष कार्यकारी दंडाधिकारी व पोलिस हेड कॉन्स्टेबल वाघ यांनी मृत्यूपूर्व जबाब नोंदविला. त्याआधारे सुरुवातीस भादंवि कलम 307  सह 34 अन्वये नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. उपचारादरम्यान सारिका हिचा मृत्यू झाल्याने आरोपींविरुद्ध खुनाचे कलम वाढविण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक आर. ए. परदेशी यांनी घटनेचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. मयत सारिका हिचा मुलगा पवन हा घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. त्यामुळे त्याचाही जबाब घेण्यात आला. तसेच सारिकावर उपचार करणारे डॉ. नरोटे यांचाही जबाब महत्त्वपूर्ण ठरला.

 खटल्यातील शिवाजी काटे व पार्वतीबाई काटे हे दोघेही हिवरेझरे गावचे माजी सरपंच होते. तर आरोपी नवनाथ काटे हा एका माजी मंत्र्याच्या गाडीचा चालक म्हणून काम करत होता.आरोपींतर्फे न्यायालयात साक्षीदार तपासण्याबाबत अर्ज करण्यात आला होता. मात्र, बचावाचा साक्षीदार तपासायचा नाही, असे सांगितल्याने अंतिम युक्तिवाद घेण्यात आला. न्यायालयाने अभियोग पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून आरोपींना शिक्षा सुनावली. आरोपींना करण्यात आलेल्या 50 हजार रुपये दंडाची रक्कम व सारिकाच्या दोन मुलांचा सांभाळ करत असलेल्या मामा ज्ञानेश्वर खरात यांना देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाने निकालपत्रात विवाहित महिलांवरील अत्याचाराबाबत अत्यंत तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.अनिल सरोदे यांनी काम पहिले.