Wed, Jun 03, 2020 18:51



होमपेज › Ahamadnagar › वाद मिटला, संसार टिकला!

वाद मिटला, संसार टिकला!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





श्रीगोंदाः अमोल गव्हाणे

घरात भांड्याला भांड लागते, त्यातून वाद होतात. नवरा-बायकोचा वाद म्हणजे ‘तुझे माझे जमेना अन् तुझ्यावाचून करमेना’. असाच किरकोळ वाद निर्माण होऊन त्यांचे परिणिती थेट जीव देण्यापर्यंत गेली होती. मात्र, इतरांसोबत पोलिसांनी समजूत काढत दाम्पत्याचा वाट मिटवित त्यांना संसाराचा कानमंत्र सांगितला. त्यांनाही तो पटला अन् ते  पोलिसांकडून प्रवासासाठी खर्ची घेऊन मार्गस्थ झाले. जाग्रितक पत्नी दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली. 

एक जोडपे आपल्या लहान मुलीसमवेत शुक्रवारी (दि.24) सकाळी औरंगाबाद येथून नांदेड- दौंड या रेल्वे पैसेंजरने दौंडच्या दिशेने निघाले होते. रेल्वे प्रवासात या उभयंतामध्ये किरकोळ कारणावरून वादावादी झाली.ही वादावादी इतकी टोकाला गेली की या महिलेने रेल्वेतून उडी घेण्याचा प्रयत्न केला. पतीसह बाजूच्या प्रवाशी मंडळीनी तिला रोखत समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ती महिला ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हती. काही  प्रवाशांनी ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. रेल्वे यंत्रणेने बेलवंडी पोलिसांशी संपर्क साधत ही माहिती दिली. रेल्वे बेलवंडी स्थानकात आल्यानंतरही त्या पती-पत्नीमध्ये वादावादी सुरू होती. बेलवंडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी दादासाहेब क्षीरसागर हे रेल्वे स्थानकात येण्याअगोदरच रेल्वेची वाट पाहत थांबले. रेल्वे आल्यानंतर या दोघांना खाली उतरवत पोलिस ठाण्यात आणले. 

या जोडप्याला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर आपण भयंकर काही तरी गुन्हा केला आहे याची जाणीव झाली अन् क्षणात दोघेही शांत झाले. पोलिस निरीक्षक राजेंद्र पडवळ यांनी या दोघांना बोलावून घेत  नवरा- बायको म्हटले की वाद होतोच, पण वादातून इतका टोकाचा निर्णय घ्यायचा नसतो असे सांगत त्या दोघांची समजूत घातली. त्या दोघांनीही आपसातील वाद मिटल्याचे सांगत आमची एकमेकाविषयी तक्रार नसल्याचे सांगितले. 

त्यानंतर पोलिस निरीक्षक पडवळ यांनी कुठे जाणार असल्याचे विचारले त्यावर त्या जोडप्याने पुणे असे सांगितले. पण औरंगाबाद येथे रेल्वेमध्ये चढत असताना पाकीट चोरी गेल्याने पुणे येथे जाण्यासाठी  पैसे नसल्याचे सांगितले. हे ऐकताच खाकी वर्दीतील माणूसकी जागी झाली. पडवळ यानी पोलिस कर्मचारी क्षीरसागर यांना बोलावून घेत  या दोघांना पुण्यापर्यंत जाण्यासाठी पैसे नाहीत त्यांना पुण्यापर्यत जाण्यासाठी पैशाची व्यवस्था करा असे सांगितले. त्या दोघांना पुण्यापर्यंत जाण्यासाठी पैसे दिले. पोलिसांची रजा घेताना त्या जोडप्याच्या चेहर्‍यावरील भाव खूप काही सांगत होते. घटना छोटी जरी असली तरी खाकी वर्दीत ही पोलिस असतो आणि त्या पोलिसालाही माणूसकी असते हे या प्रसंगातून अधोरेखित होते.