Sat, Jul 20, 2019 08:39होमपेज › Ahamadnagar › जिल्हा विभाजनाचे स्वप्न दाखविताच कसे? : सुजय विखे 

जिल्हा विभाजनाचे स्वप्न दाखविताच कसे? : सुजय विखे 

Published On: May 05 2018 12:47AM | Last Updated: May 04 2018 11:18PMपारनेर : प्रतिनिधी    

पालमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यात अधिकार्‍यांचे प्रभारी राज असताना जिल्हाविभाजनाचे स्वप्न कसे दाखविले जाते, असा सवाल डॉ. विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी केला. 

तालुक्यातील ढवळपुरी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. विखे यांनी दक्षिण नगर जिल्ह्याच्या खुंटलेल्या विकासप्रक्रियेवर कडक शब्दांत टीका करून पालकमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेवरही हल्‍ला चढविला. मागील अनेक वर्षे ज्यांना तुम्ही मतदान करीत आहात, त्यांना जाब विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पाणीपुरवठा योजनेचा खेळ खंडोबा कोणी केला? योजनेचे पाईप कोणाच्या घरात गेले? याची चौकशी झाली पाहिजे.

अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत मिळविलेला विजय विकासासाठी मिळालेला आहे. या गावाने माजी खा. स्व. बाळासाहेब विखे यांच्यावर सातत्याने प्रेम केले. तेच माझ्या प्रतीही पहावयास मिळते आहे, हा आनंद मोठा आहे. सामान्य माणसासाठी असलेल्या सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी तालुक्यात विशेष प्रयत्न करण्याचे ग्वाही देऊन ते म्हणाले, जिल्ह्यात योजनांच्या अंमलबजावणीत प्रशासन ठप्प आहे. पालकमंत्र्यांच्या तालुक्यानेच गुन्हेगारीची परिसीमा गाठल्याचा आरोप त्यांनी केला. ढवळपुरी भागातील के. के. रेंजचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण राज्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. पंचायत समितीचे सभापती राहलु झावरे, जि. प. सदस्या पुष्पा वराळ, डॉ. राजेश भनगडे, डॉ. भास्कर शिरोळे,दिनेश बाबर, शांताराम कुटे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.