Thu, Jul 18, 2019 00:16होमपेज › Ahamadnagar › पालकमंत्र्यांकडून गुंडांचे पोषण! : अजित पवार 

पालकमंत्र्यांकडून गुंडांचे पोषण! : अजित पवार 

Published On: May 03 2018 1:27AM | Last Updated: May 02 2018 11:51PMजामखेड : प्रतिनिधी

नगर जिल्ह्यात महिनाभरात दोन हत्याकांड झाली. या घटनेने कायदा व सुव्यवस्थाची लक्तरे वेशीवर टांगली आहे. सध्या दहशतवादाला राजाश्रय मिळत असून, गुंडाना पोसण्याचे काम पालकमंत्र्यांकडून होत आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

पवार यांनी काल (दि.2)दुपारी चारच्या सुमारास मयत योगेश व राकेश यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सुमारे दीड तास चर्चा केली. या दोन्ही कुटुंबीयांनी मुख्य आरोपीला अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी पीडित कुटुंब, नातेवाईक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, डॉ. भास्करराव मोरे, दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात व अमित जाधव यांच्याकडून घडलेला घटनाक्रमाची माहिती घेतली. 

पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश ऊर्फ रॉकी राळेभात यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या झाली. या घटनेचा मी निषेध करतो. या घटनेचा मास्टरमाईंड जोपर्यंत सापडत नाही व त्यांना फाशी होत नाही, तोपर्यंत आम्ही या कुटुंबीयांच्या पाठीमागे राहू. पोलिसांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी करावी. पोलिस जर कमी पडत असतील, तर मुख्यमंत्र्यांना भेटून एसआयटी किंवा सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी करू. 

सरकार शेतकर्‍यांना न्याय देऊ शकत नाही. आमच्या आई-बहिणींवर अत्याचार होत असताना त्यांचे संरक्षण करू शकत नाही. राज्यात गुंडगिरी वाढली आहे. या सर्व घटनेच्या पार्श्‍वभूमीवर येत्या अधिवेशनात आवाज उठविणार आहोत. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते असून, त्याला ते न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे गृहखात्याला स्वतंत्र मंत्र्यांची गरज आहे. शाहू-फुलेंच्या राज्यात अशा घटना घडत असतील तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवील, असेही पवार म्हणाले.