Tue, May 21, 2019 22:17होमपेज › Ahamadnagar › राहुरीचे कुख्यात गुंड माळी बंधू तडीपार

राहुरीचे कुख्यात गुंड माळी बंधू तडीपार

Published On: May 03 2018 1:27AM | Last Updated: May 02 2018 11:42PMनगर/राहुरी : प्रतिनिधी

राहुरी तालुक्यातील कुख्यात वाळूतस्कर सुभाष माळी व त्याच्या दोन बंधूंना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी मंगळवारी (दि. 1) याबाबतचा आदेश काढला आहे.

तडीपार झालेल्यांमध्ये टोळीप्रमुख सुभाष साहेबराव माळी, किशोर साहेबराव माळी, गौतम साहेबराव माळी (तिघे रा. आतार मळा, बारागाव नांदूर, ता. राहुरी) यांचा समावेश आहे.  

दरम्यान, या टोळीच्या गुन्हेगारीविरोधात ‘पुढारी’ने आवाज उठविला होता. त्यामुळे परिसरातील रहिवाशांनी ‘पुढारी’चे आभार मानले आहे. चंदनतस्करी, वाळूतस्करी, शेतकर्‍यांची मोटारचोरी, गुंडागिरी, दरोडे, शासकीय अधिकार्‍यांना मारहाण आदी प्रकरणांत बरबटलेल्या माळी बंधूंच्या टोळीत अल्पवयीन मुलांनीही वाळूतस्करीत उडी घेतली. परिणामी माळी बंधूंकडे अल्पावधित बक्कल पैसा जमा झाला. पैशाच्या माध्यमातून माळी कंपनीने राजकीय आणि प्रशासकीय ‘सोयरिक’  जमविली. यामुळे माळी बंधूंसह त्यांच्या गँगची  बारागाव नांदूर गावासह परिसरात मोठी दहशत निर्माण झाली. गावामध्ये महिलांची छेड, शाळा व महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थिंनींना त्रास देणे, शासकीय शाळा व अंगणवाड्यांमध्ये रात्री-अपरात्री चोर्‍या, प्राथमिक आरोग्य केंद्रात चोरी, धूमस्टाईलने दहशत, वाळूतस्करी इत्यादी प्रकारे गुंडगिरी केली. तसेच कारवाईसाठी महसूल किंवा पोलिस पथक आल्यास त्यांच्यावर हल्ल्याचे प्रकारही सर्वश्रूत आहेत.

बारागाव नांदूर भागातील वाळू लिलाव होतच नसल्याने माळी बंधूंसाठी मुळा नदीपात्र जहागिरीच होती. नदीपात्रात माळी बंधूंच्या मर्जीशिवाय कोणाची उतरण्याची हिंमत नव्हती. दरम्यान, महसूल प्रशासनाने माळी बंधूंच्या कृत्याला कंटाळत अखेर बारागाव नांदूर भागातील वाळू लिलाव करण्याचा निर्णय घेतला. लिलावाच्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम ग्रामनिधी म्हणून गावासाठी मिळणार असल्याने ग्रामस्थांनी वाळू ठेकेदाराला साथ देण्याचा निर्णय घेतला. ठेकेदारांनीही गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मात्र, आमच्या जहागिरीत कोणी येऊ नये, असे सांगत माळी बंधूंनी वाळू उचलण्यास विरोध केला. यावरून माळी बंधूंविरोधात ग्रामस्थांनी एकीचा निर्णय घेत पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यातच किशोर माळी याने गावातील एका अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडिलांसमोरून उचलून नेत पीडित कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने हे प्रकरण आणखी चिघळले.

दरम्यान,‘पुढारी’च्या माध्यमातूनही माळी बंधूंच्या कृत्यामुळे गावात निर्माण झालेली गुन्हेगारी पुढे आल्याने अखेर जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पो. नि. प्रमोद वाघ यांनी तिघांवरील तब्बल 20 ते 25 गुन्ह्यांचा अहवाल एकत्र करीत सुभाष माळी, किशोर माळी व गौतम माळी यांना जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.