Wed, Jun 26, 2019 11:22होमपेज › Ahamadnagar › देशाची अराजकतेकडे वाटचाल

देशाची अराजकतेकडे वाटचाल

Published On: Mar 15 2018 1:17AM | Last Updated: Mar 15 2018 12:18AMसंगमनेर : प्रतिनिधी

मराठवाडा आणि विदर्भात आज  अनेक शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतात. मात्र, या सरकारला त्याचे काहीच घेणे-देणे नाही. सध्याचे हे  सरकार उद्योजक व भांडवलदारांना सांभाळण्यात व्यस्त आहे. ही सर्व अराजकतेच्या दिशेने वाटचाल सुरू  असल्याची चिंता माजी खासदार, तसेच ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. 

अमृत उद्योग समुहाच्या वतीने स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावर आयोजित आदरांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर  होते.व्यासपीठावर कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, उद्योजक पंडितराव थोरात, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, शिवाजीराव थोरात, लक्ष्मणराव कुटे, हरिभाऊ वर्पे, इंद्रजित थोरात  उपस्थित होते.

डॉ. मुणगेकर म्हणाले की, निवडणुकीत गोरगरिबांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले गेले. गोरगरिबांच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्याची खोटी आश्‍वासने दिली. याबाबत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र काहीच बोलत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या जीवनमूल्यांचा वारसा समृद्धपणे सांभाळताना आ. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पक्षनिष्ठ व प्रामाणिक कामातून लाखो माणसे जोडली. महाराष्ट्राला खर्‍याअर्थाने शेतकरी, कामगार, कष्टकरी यांची जाणीव असलेल्या या नेत्यांची गरज आहे. वैचारिक दूरदृष्टी व  सर्व क्षेत्रांतील जाण यामुळे त्यांचे भविष्य निश्‍चित उज्ज्वल असल्याचे  ते म्हणाले.

यावेळी प्रा. अशोक मिश्रा, प्रा. बाबा खरात, बबन राऊत, गायकवाड बाबा, मोहनराव करंजकर, नवनाथ आंधळे यांचीही भाषणे झाली.प्रास्ताविक थोरात कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व आभार कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी मानले.