Sat, Apr 20, 2019 17:52होमपेज › Ahamadnagar › सैनिकांसह शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान 

सैनिकांसह शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान 

Published On: Feb 13 2018 2:05AM | Last Updated: Feb 13 2018 12:19AMधानोरे : वार्ताहर

देशासाठी लढलेल्या सैनिकांचा आगळा वेगळा सन्मान सोहळा तोही विवाहप्रसंगी अशा अविस्मरणीय दुग्धशर्करा योगाचा अनुभव संगमनेर व कोपरगाव तालुक्यांतील जनतेला आला. आपल्या मुला-मुलींच्या विवाहासाठी 11 फेब्रुवारीचा मुहूर्त ठरवून माजी सैनिक असलेल्या दोन व्याह्यांनी या सोहळ्यात मराठा लाईट रेजिमेंटचा भव्य वर्धापन दिन साजरा केला.

संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील सेवानिवृत्त सुभेदार गोरख यमन ढमक यांचा मुलगा शिवराज व बोलकी (ता.कोपरगाव) येथील सेवानिवृत्त सैनिक कैलास महाले यांची कन्या नूतन यांचा विवाह निश्चित झाला होता. या दोन्ही व्याह्यांनी एकमताने कर्तव्य बजावलेल्या मराठा लाईट इन्फंट्री (21 पॅरा स्पेशल फोर्स) या बटालियनच्या वर्धापन दिनाचा (11 फेब्रुवारी) मुहूर्त निश्चित केला. देशातील मराठा जाट, डोंगरा, शीख यांची मिळून बनलेल्या या बटालियनची स्थापना 1985 मध्ये करण्यात आली होती. शौर्यासाठी ओळखल्या जाणार्‍या या बटालियनचे नंतर ‘21 पॅरा स्पेशल फोर्स’ असे नामांतर झाले. ईशान्य भारताच्या सीमांच्या रक्षणाची जबाबदारी ही बटालियन आजही  पार पाडत आहे.

कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ्यापूर्वी झालेल्या वर्धापन दिनासाठी या बटालियनचे हिमाचल प्रदेश, राजस्थान, बंगलोर, दिल्ली सह राज्यातील सुमारे 200 पेक्षा अधिक जवान त्यांचे कुटुंबीय तसेच धारातीर्थी पडलेल्या वीर जवानाचे कुटुंबीय उपस्थित होते. 

मराठा महासंघाचे नगर जिल्हाध्यक्ष लालूशेठ दळवी, आ. स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, जुना मराठा ग्रुपचे प्रभाकर सावंत, सुभेदार डी. वाय. गंगणवार, अंकुश चाळके, उत्तम खंडागळे, सरताज कटोच (हिमाचल प्रदेश) हेमराज चांग (राजस्थान), सुभेदार मेजर उत्तम टीका यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रपती शौर्यचक्र विजेते मधुसूदन सुर्वे, मरणोपरांत राष्ट्रपती शौर्यचक्र विजेते भानुदास उदार यांच्या वीरपत्नी छायाताई, विठ्ठल खंडागळे यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. यानंतर सुभेदार बाळू मोहरे यांनी बटालियनच्या शौर्याची 30 मिनिटांची चित्रफित दाखवून गौरवशाली इतिहासाची माहिती दिली. भारतमातेच्या जयजयकाराच्या पार्श्वभूमीवर वाजणार्‍या देशभक्तिपर संगीतामुळे विवाह सोहळ्याला विशेष दर्जा प्राप्त झाला होता. यानंतर बटालियनच्या वर्धापन दिनानिमित्त जवानांनी केक कापल्यानंतर वधू-वरांचा विवाह सोहळा झाला.

या उपक्रमासाठी सुभेदार गोरख ढमक, नायब सुभेदार सुरेश प्रधान, हवालदार पी. जी. आंबरे, माऊली वर्पे, शिवाजी ढमक आदींनी विशेष परिश्रम घेतले.

वीरपत्नी छायाताई यांचा विशेष गौरव

कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राष्ट्रपती शौर्यचक्र विजेते मधूसुदन सुर्वे हे 1992 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना सुभेदार गोरख ढमक यांनी प्रशिक्षण दिले होते. 20 जून 2005 रोजी मणिपूर येथील चुराचंदपूर येथे आतंकवाद्यांनी हल्ला केला होता. यावेळी सशस्त्र अतिरेक्यांबरोबर झालेल्या चकमकीत सुर्वे यांना 11 गोळ्या लागल्या होत्या. यात त्यांनी 18 आतंकवादी मारले होते. या धैर्याबद्दल त्यांचा राष्ट्रपती शौर्यपदक देऊन सन्मान करण्यात आला होता. तसेच दुसर्‍या कारवाईत शहीद झालेले भानुदास उदार यांना मरणोपरांत शौर्यचक्राने सन्मानित करण्यात आले होते. या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या वीरपत्नी छायाताई यांचाही स्मृतिचिन्हाने विशेष गौरव करण्यात आला.