Sun, May 26, 2019 18:39होमपेज › Ahamadnagar › ‘हायमास्ट’ घोटाळ्याची होणार चौकशी!

‘हायमास्ट’ घोटाळ्याची होणार चौकशी!

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 20 2018 11:02PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात लावण्यासाठी देण्यात येणार्‍या हायमास्ट दिव्यांच्या प्रक्रियेला घोटाळ्याचा ‘वास’ येऊ लागल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी हायमास्ट दिव्यांची खरेदी प्रक्रिया, निविदा प्रक्रियेची सविस्तर चौकशी करण्यात येणार असून, त्यानुसार दोषी आढळणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात 430 च्या वर हायमास्ट दिव्यांच्या खरेदीसाठी एकत्रित ई-निविदा काढण्याची गरज असतांना 16 पेक्षा जास्त दुकानदारांच्या नावाने स्वतंत्र निविदा काढून दिव्यांची खरेदी करण्यात आली आहे. जास्त खरेदी केल्यास बाजारभावापेक्षा 15 ते 20 हजार रुपयांनी कमी दरात दिवे मिळाले असते. मात्र स्वतंत्र निविदा काढत दिव्यांच्या किमती वाढविल्याचा आरोप होऊ लागला असल्याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर चौकशीचा निर्णय घेण्यात येत आहे.

अंदाजे 2 कोटी रुपयांहून अधिक हायमास्ट दिव्यांच्या खरेदीसाठी 16 पेक्षा जास्त ठेकेदारांनी वेगवेगळ्या दुकानांच्या नावावर निविदा भरल्या आहेत. ठराविक ठेकेदारांच्या फायद्यासाठी एकत्रित निविदा काढण्यात आल्या असल्याचा संशय आहे. निविदा पद्धतीचा वापर करून बाजारभावापेक्षा जास्त दराने हायमास्ट दिवे बसविल्याचे पुढे येत आहे. दक्षिण जिल्ह्यासाठी 203 तर उत्तर जिल्ह्यासाठी 121 पेक्षा जास्त हायमस्टची खरेदी करण्यात आली आहे.हायमास्ट खरेदीसाठी जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषद सेसमधून दोन कोटी रुपये निधी खरेदीसाठी देण्यात आले होते. 430 पेक्षा जास्त हायमास्ट खरेदीसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आली. ह्या सर्व नियमांना धाब्यावर बसवत कमी रकमेच्या निविदा काढण्यात आल्याचे प्रथमदर्शी तरी दिसून येत आहे.

यापूर्वीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे हायमास्ट दिव्यांच्या संदर्भात असलेली फाईल आल्यानंतर त्यांनी अशा प्रकारे खरेदी करण्याला मंजुरी देण्याचे टाळले होते. अशा खरेदीसाठी ‘पुढाकार’ घेणारा एक कर्मचारी निवृत्त होण्यास आला असल्याची माहिती असून, त्याच्याबाबत अधिकार्‍यांना पूर्वीचाच ‘अनुभव’ आहे. त्यामुळे पूर्वीचे अधिकारी ह्या कर्मचार्‍याने आणलेल्या फाईल्स पूर्ण खात्री झाल्याशिवाय मंजूर करत नसत. चौकशी प्रक्रियेत याचीही सखोल चौकशी होण्याची गरज आहे.

प्रत्यक्षात किती हायमास्ट दिवे लावलेत?

जिल्हा परिषदेकडून 430 पेक्षा जास्त हायमास्ट दिवे लावण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात ते दिवे लावले आहेत की नाही? याबाबत साशंकता आहे. नगर महापालिकेत झालेल्या पथदिवे घोटाळ्याप्रमाणे जिल्हा परिषदेतही हायमास्ट दिवे न बसविता बिल काढण्यात आले तर नाही ना? असाही संशय व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद यंत्रणेकडे याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडेही समाधानकारक उत्तर नसल्याने संशयाचे ‘ढग’ गडद होत आहेत.