Mon, Jul 22, 2019 02:43होमपेज › Ahamadnagar › ‘हायप्रोफाईल’ आंतरराज्यीय टोळी जेरबंद!

‘हायप्रोफाईल’ आंतरराज्यीय टोळी जेरबंद!

Published On: Jul 04 2018 2:11AM | Last Updated: Jul 03 2018 10:27PMनगर : प्रतिनिधी

अलिशान ऑडी, फॉर्च्युनरसारख्या गाड्यांमधून येत स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून अनेकांना लुटणार्‍या हायप्रोफाईल आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले. पुणे  जिल्ह्यातल्या कार्ला फाटा येथील जुन्या पुणे-मुंबई हायवेवर ही थरारक कारवाई करण्यात आली. यामध्ये सहा पैकी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, मागील महिन्यात शिर्डी येथील एकास आरोपींनी ‘आम्हाला सोन्याचे कॉइन सापडले असून, ते कमी किमतीत विकत आहोत’, असे सांगितले. हे कॉईन घेण्यासाठी आलेल्याची पैशांची बॅग घेऊन आरोपी पसार झाले. याबाबत शिर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या.

त्यानुसार अशाच प्रकारचा गुन्हा करणारे काही जण पुणे जिल्ह्यातल्या कार्ला फाटा येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक कैलास देशमाने, श्रीधर गुट्टे, सुधीर पाटील, राजकुमार हिंगोले, योगेश गोसावी, दत्ता हिंगडे, दिगंबर कारखेले, रवींद्र कर्डीले, मनोज गोसावी आदींच्या पथकाने आरोपींकडे बनावट गिर्‍हाईक पाठवून सापळा लावला.

आरोपी हे असे गुन्हे करण्यात सराईत असल्याने त्यांनी बनावट सोने दाखविण्याचे ठिकाण सातत्याने बदलले. परंतु पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांना निश्चित आरोपी व त्यांच्या वाहनांची माहिती झाली. त्यानुसार आरोपींना सिनेस्टाईल पाठलाग करून जुन्या पुणे-मुंबई हायवेवर पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपींकडे अलिशान ऑडी कार, फॉर्च्युनर गाडी मिळून आली.अटक केलेल्यांमध्ये टोळीचा म्होरक्या भिमाभाई गुलशनभाई सोलंकी (वय 41, रा. बडोदा, गुजरात, हल्ली रा. देवगाव तळवडे जिल्हा पुणे), हारून सय्यद अहमद शेख (वय 43), गणेश हिरा काशीद (रा. काशीनगर नागपूर, हल्ली रा. पुणे) व संतोष शिवराम गोपाळे (वय 42, रा. आकुर्डी, जिल्हा पुणे) यांचा समावेश आहे. आरोपींकडून अजूनही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नागरिकांची यापूर्वी अशा प्रकारे फसवणूक झालेली असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टोळीच्या म्होरक्याकडे कोट्यवधींची मालमत्ता

या टोळीचा म्होरक्या भिमाभाई हा बर्‍याच वर्षांपासून पुणे, नाशिक, सातारा, ठाणे व मुंबई परिसरात स्वस्तात सोने देण्याचे आमिषाने लूटमार करत होता. परंतु यापूर्वी त्याला अटक झाली नव्हती. त्याच्याकडे एक अलिशान फार्म हाऊस, एक अलिशान फ्लॅट, एक राहते घर, ऑडी कार (एम एच 14 एफ एस 2526) एक फॉर्च्युनर गाडी (एम एच 14 ई पी 4) व एक डस्टर कार अशी कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

आरोपी अशा प्रकारे करायचे लूटमार

या टोळीचा म्होरक्या हा त्याच्या साथीदारांना मजूर असल्याचे भासवत होता. त्यांच्याकडे खरे असलेले चांदीचे व सोन्याचे काही जुने तयार केलेले नाणे देऊन ठराविक लोकांना आरोपी हेरत असत. ‘हे नाणे आम्हाला खोदकाम करतांना सापडले असून, ते आम्हाला विकायचे आहेत’, असे सांगत. सांगतांना प्रथम खरे असलेले सोन्या चांदीचे दागिने दाखवत. त्यानंतर स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लोकांची लूटमार करण्यात येत होती.