Mon, Jan 21, 2019 21:38होमपेज › Ahamadnagar › वारकर्‍यांना देणार आरोग्य सुविधा!

वारकर्‍यांना देणार आरोग्य सुविधा!

Published On: Jun 30 2018 1:14AM | Last Updated: Jun 29 2018 11:39PMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दिंड्या व वारकरी पंढरपूरला जाणार असल्याने आवश्यक त्या ठिकाणी आरोग्य सुविधा पुरविण्याचे निर्देश आरोग्य समितीच्या सभेत देण्यात आले. यासह दूषित पाणीपुरवठ्यात सुधारणा करावी, साथरोगांवर उपाययोजना कराव्यात, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सर्पदंशाच्या लसी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आरोग्य समितीची सभापती राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेस सदस्य सीताराम राऊत, रामभाऊ साळवे, नंदा गाढे, सविता अडसुरे, कविता लहारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी, कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. ही सर्व पदे भरण्याबाबत शासनाकडे विनंती करण्याचा ठराव घेण्यात आला. पावसाळ्याचे दिवस असल्याने जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हास्तरावर पुरेशा प्रमाणावर लसी व औषधे उपलब्ध करून देण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले.

पावसाळ्यात जिल्ह्यात साथरोगाचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे अशा प्रकारच्या साथरोगांना नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्या गावांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे निर्देश देण्यातआले. मंजूर झालेल्या व काम सुरु असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या, उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचेही निर्देश देण्यात आले.