Sun, Mar 24, 2019 08:16होमपेज › Ahamadnagar › यूपीएससी परीक्षेत पाटील व चव्हाण उत्तीर्ण

यूपीएससी परीक्षेत पाटील व चव्हाण उत्तीर्ण

Published On: Apr 29 2018 2:10AM | Last Updated: Apr 28 2018 11:39PMकर्जत : प्रतिनिधी 

तालुक्यामधील हर्षल रामचंद्र पाटील व अविनाश सुंदरदास चव्हाण हे दोघे केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.

यूपीएससीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्‍वरी येथील हर्षल रामचंद्र पाटील हे देशात 833 वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले, तर अविनाश सुंदरदास चव्हाण हे देशात 876 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांत तालुक्यातील अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत. यावेळी यूपीएससटी परीक्षेत उत्तीर्ण झालेले दोघेही येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. 

टाकळी खंडेश्‍वरी येथील हर्षल पाटील ज्यांनी जिल्ह्याला शिक्षणाची दारे प्रथम उघडली, असे कर्मवीर दादा पाटलांचे पणतू व अण्णासाहेब यशवंत ढोबे यांचे नातू आहेत. हर्षल यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात झाले. ते साधना व  रामचंद्र अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजिव, तर  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील यांचे पुतणे आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर टाकळी खंडेश्‍वरी गावात फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली. 

अविनाश चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात झाले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना त्यांना नाटकांत काम करण्याची आवड निर्माण झाली. कलाकार म्हणून त्यांना करिअर करायचे होते. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत त्यांनी भूमिका केलेल्या ‘खेळ मांडला’ या नाटकाने प्रथम क्रमांक व करंडक पटकावला होता. चव्हाण यांनी ‘वाट पहाटेची’ हे नाटक लिहले. या नाटकास कोकण महोत्सवात प्रथम पुरस्कार मिळाला आहे. या दोघांचे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सील सदस्य राजेंद्र फाळके, प्राचार्य खेतमाळीस, दामोदर अडसूळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. सुधीर तांबे यांनी अभिनंदन केले आहे.