Wed, Jul 17, 2019 20:59होमपेज › Ahamadnagar › गुरुजींचा निर्णय शिक्षण समितीत!

गुरुजींचा निर्णय शिक्षण समितीत!

Published On: May 28 2018 1:47AM | Last Updated: May 27 2018 11:12PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी गेलेल्या गैरवर्तणुकीची शिक्षा त्यांना मिळणार आहे. गैरकृत्य करून जिल्हा परिषदेची बदनामी करणार्‍या शिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय या आठवड्यात होणार्‍या शिक्षण समितीच्या सभेत होण्याची शक्यता आहे. झेडपीच्या बदनामीने व्यथित सदस्यांनी तशी तयारी चालविण्याचे समजते.

गेल्या महिन्यात कर्जत तालुक्यातील एका शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नीट देता आली नाही म्हणून एका विद्यार्थ्यांच्या घशात छडी घातली होती. या घटनेत तो विद्यार्थी गंभीर जखमी झाला. दुसर्‍या एका घटनेत घरगुती वादातून एका शिक्षकाने स्वतःच्या भावावरच गोळीबार केला होता. या घटनेत त्या शिक्षकाचा भाऊ थोडक्यात बचावला. तिसर्‍या घटनेत उन्हाळ्याच्या सुट्टीचा फायदा घेत जुगार खेळणार्‍या शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षक बँकेच्या एका सदस्याला पोलिसांनी अटक केली. या घटनांमुळे शिक्षण विभागाची प्रतिमा घुळीस मिळाली.

त्यामुळे काही सदस्यांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना काय कारवाई करणार? असा जाब विचारला. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन कारवाई करण्याच्या बेतात आले आहे. शिक्षण समितीची सभा या आठवड्यात आयोजित करण्यात आली आहे. सद्यस्थितीत विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरु असल्याने या सभेत फक्त आढावा घेण्यात येणार आहे. शिक्षकांच्या कारवाईबाबत शिक्षण समितीत चर्चा होऊन कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना शिफारस करण्यात येण्याची शक्यता आहे.