Sat, Sep 22, 2018 11:30होमपेज › Ahamadnagar › शिर्डीत गुरू पौर्णिमा दिवस साजरी 

शिर्डीत गुरू पौर्णिमा दिवस साजरी 

Published On: Jul 27 2018 3:07PM | Last Updated: Jul 27 2018 3:07PMशिर्डी : प्रतिनिधी

शिर्डी येथे साईबाबा मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून गुरु पोर्णिमा साजरी करण्यात आली. लाखो भाविकांनी या निमित्‍ताने साई मंदिरात साईबांचे दर्शन घेतले. 

पहाटेची काकड आरती झाल्‍यानंतर साईबाबांचे पवित्र ग्रंथ साई सतचरित्र, वीणा आणि सोट्या या वस्तूंची सवाद्य मिरवणूक काढून समाधी मंदिरात भाविकांना पाहण्यासाठी ठेवली आहेत. सकाळपासून भाविकांच्या मुंबई, औरंगाबाद, गुजरात, आंध्र प्रदेश आदी भागातून पालख्या शिर्डीत येत आहेत.


यंदाचे वर्ष साईबाबा समाधी शताब्दी वर्ष असल्यामुळे साईबाबांच्या संस्थान प्रशासनच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसाद ,उदि, बुंदी प्रसाद, चहा, पाणी, बिस्कीटे आदी सुविधा दर्शन बारीत मोफत ठेवण्यात आल्‍या आहेत. त्याचप्रमाणे मंदिर परिसर विधुत रोषणाई आणि  फुलांच्या सजावटीने खुलून आकर्षक दिसत आहे.

भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच भाविकांना साईनामात न्हाऊन निघण्यासाठी दिवसभर साई संध्या, कीर्तन, हजेरीच्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले. त्यामुळे गुरुपौर्णिमेचा हा उत्सव मोठ्या मंगलमय वातावरणात साजरा होत आहे.