Wed, Jun 26, 2019 11:25होमपेज › Ahamadnagar › पालकमंत्री शिंदे यांनी राजीनामा द्यावा

पालकमंत्री शिंदे यांनी राजीनामा द्यावा

Published On: Apr 29 2018 11:53PM | Last Updated: Apr 29 2018 11:47PMजामखेड ः प्रतिनिधी

शहरातील वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना पाठिशी घालणार्‍या  पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केली आहे. 

 शहरातील राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात या युवकांची शनिवारी अनोळखी हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष घुले यांनी जामखेडला भेट देवून पत्रकार परिषद घेतली.  

यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, राजेंद्र फाळके, अरूण कडू, बाळासाहेब जगताप, प्रदेश संघटक राजेंद्र कोठारी, प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, डॉ. भास्कर मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, संभाजी राळेभात, नरेंद्र जाधव, अरूण जाधव, अमित जाधव, मनोज भोरे, कुंडल राळेभात, राजेंद्र गोरे, हरिभाऊ आजबे  यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 घुले म्हणाले, जामखेड तालुक्यात सर्व सरकारी कार्यालयात प्रभारीराज असून, कोणीही जबाबदार अधिकारी कार्यरत नाहीत. काल घडलेल्या घटनेनंतर ग्रामीण रुग्णालयात कोणीही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हता. यादरम्यान  पालकमंत्री शिंदे हे जामखेड शहरात हजर होते. ते जर रुग्णालयात आले असते तर  वैद्यकिय अधिकारी हजर राहिले असते व तरुणांचे प्राण वाचले असते.

जामखेड पोलिस ठाण्यात गेली 3 वर्षात अनेक पोलिस अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्या झालेल्या आहेत. जामखेड पोलिस ठाण्याला सक्षम पोलिस अधिकार्‍याची गरज आहे.सातत्याने होत असलेल्या गोळीबाराच्या घटनांवरून जामखेडचा बिहार झाला असून, येथील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. शहरात अनेक गुंडांकडे अवैध शस्र आहेत. त्यांचे अवैध धंदे आहेत. त्यातूनच अशा घटना घडत आहेत.यावरून असे दिसते की, या गुंडांना भाजप व पालकमंत्र्यांचा वरदहस्त आहे काय ? असा प्रश्र उपस्थित होत आहे.  

शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यामुळे येथील नागरिक व व्यापारी भयभीत झाले असून, हे लोक स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी आता सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येवून अशा प्रवृत्तीविरोधात लढा उभारला पाहिजे. आम्ही त्यांच्या मागे उभे राहू असे आवाहन घुले यांनी  केले. 

प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, या हत्याकांडामध्ये पालकमंत्री व भाजप यांची ताकद असून, सक्षम अधिकारी येवू न देण्यासाठी पालकमंत्री स्वतः प्रशासनावर दबाव टाकत आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते खुलेआमपणे पोलिसांना हाताशी धरून गुंडगिरी करत आहेत.शहरात तालमीच्या माध्यमातून गुंडगिरी वाढत असून या गुंडांना जिल्ह्याबाहेरील गुंडांची साथ मिळत आहे. आज पोलिस खुलेआमपणे अवैध धंद्यावाल्यांकडून हप्‍ता गोळा करत असून, त्यातील काही वाटा पालकमंत्र्याकडे जात असल्याचा आरोप  केला. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे.अशा घटनेनंतर प्रत्येक तपासामध्ये  भाजपाच्या कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. जोपर्यंत या घटनेतील मुख्य आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत  अंत्यविधी केला जाणार  नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

डॉ. लामतुरे यांच्यावर निलंबनाची कारवाई

योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्यावर उपचार करताना दिरंगाई केल्याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत  लामतुरे यांचेवर 24 तासात निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आशिष कोकरे यांनी जामखेड येथे पत्रकार परिषदेत दिली.