Tue, Jul 23, 2019 04:03होमपेज › Ahamadnagar › पालकमंत्री शिंदे पूजेपासून वंचित? 

पालकमंत्री शिंदे पूजेपासून वंचित? 

Published On: Jul 23 2018 1:06AM | Last Updated: Jul 22 2018 10:31PMकर्जत : गणेश जेवरे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी कर्जतसह राज्यामध्ये आंदोलन सुरू आहे. यामध्ये आज होणार्‍या आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठलाच्या पुजेला येवून देणार नाही, असा निर्णय जाहीर केला होता आणि मुख्यमंत्री यांनी होणार्‍या गोंधळाची पार्श्‍वभूमी पाहता पंढरपूरला येणार नाही, असे जाहीर केले आहे. याचप्रमाणे कर्जत येथे मराठा समाजाच्या मोर्चाच्या वेळी अनेकांनी भाषणामध्ये 8 ऑगस्ट रोजी कर्जत येथे ग्रामदैवत व धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोदड महाराज यांच्या रथयात्रेच्या वेळी अभिषेक करण्यासाठी पालकमंत्री यांना येवू देणार नाही, असे जाहीर केले होते. यामुळे आता पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांना मराठा समाज कर्जत येथील यात्रेच्या वेळी पूजा करण्यापासून रोखणार काय ? याबाबत उत्सुकता लागली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यामध्ये सध्या आंदोलने सुरू आहेत. कर्जत येथे दि.20 रोजी सकल मराठा समाज यांचे वतीने आंदोलन करण्यात आले. यामध्ये आदल्या दिवशी रात्री शेकडो युवकांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यानंतर दुसर्‍या दिवशी कर्जत शहर बंद ठेवण्यात आले. यामध्ये शाळा व महाविद्यालये बंद होती. याशिवाय शेकडो युवकांनी मोर्चा काढून दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी अनेक युवकांनी व नेत्यांनी भाषणे केली. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय आता माघार नाही, प्रसंगी कशालाही तोंड देण्याची युवकांची तयारी आहे असे सांगताना पंढरपूर येथे जसे मुख्यमंत्री यांना समाज विठ्ठलाची पूजा करू देणार नाही तशी कर्जत येथे ग्रामदैवताच्या यात्रेच्या वेळी पालकमंत्री राम शिंदे यांना पूजा करून देणार नाही, त्यांना आम्ही रोखणार अशी प्रक्षोभक भाषणे अनेकांनी केली होती. यामुळे पालकमंत्री यांना मराठा समाज पुजेपासून रोखणार का अशी चर्चा तालुक्यामध्ये सुरू झाली आहे. 

मराठा युवक आक्रमक

आज सर्व जाती व धर्मामध्ये गरिबी आणि बेरोजगारी हे प्रश्‍न गंभीर आहे. याला अपवाद मराठा समाज देखील आहे. राज्यामध्ये बहुसंख्येने असणारा हा सर्वात मोठा समाज आज या दोन प्रश्‍नांमुळे त्रस्त झाला आहे. आज मराठा समाजामध्ये अनेक कुटूंब फार गरिबीमध्ये आहेत. अनेकांना शिक्षणाची फी भरण्यास पैसे मिळत नाहीत तर नोकरीमध्ये आरक्षण नसल्याने अनेक वर्षे एकाच पदावर काम करावे लागते. पदोन्नती किंवा पगारवाढ मिळत नाही. यामुळे गुणवत्ता असूनही त्यांना मागे रहावे लागत आहे आणि आज वाढती लोकसंख्या, मोठे कुटूंब यामुळे ही समस्या चांगलीच जाणवत आहे.

वैद्यकीय प्रवेशाला अडचण

आज युवकांचा ओढा वैद्यकीय किंवा इंजिनिअरींग या दोन विभागाकडे जास्त आहे. याशिवाय स्थानिक महाविद्यालयामध्ये अकरावीमध्ये प्रवेश घेताना मराठा समाजातील युवकांना जास्त मार्क असूनही फी भरून प्रवेश घ्यावा लागत आहे. अनेक युवकांना घरची परिस्थिती गरिबीची असल्याने चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळत नाही आणि दुसरीकडे कमी मार्क असताना आरक्षणामुळे मोफत प्रवेश मिळत आहे. यामुळे समाजामध्ये ही दरी रुंदावत आहे आणि यामुळे समाजातील युवक आक्रमक झाला आहे. पांरपारिक शेती व्यवसाय हा लहरी निसर्ग आणि हमीभाव नसल्याने संकटात आला आहे. त्याची थेट झळ या समाजाला पोहचत आहे. यामुळे आता आर या पारची लढाईसाठी  समाज सज्ज झाला आहे.