Fri, Jul 19, 2019 05:06होमपेज › Ahamadnagar › प्रदर्शनातून महिला होतील ‘कारभारी’!

प्रदर्शनातून महिला होतील ‘कारभारी’!

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 11:22PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाने पुढाकार घेतला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना सक्षम करुन प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. स्वयंसहाय्यता गटांचे प्रदर्शन हा त्याचाच एक भाग आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून आगामी काळात महिला ‘कारभारी’ झाल्याशिवाय राहणार नसल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

शहरातील तांबटकर मळा येथील मैदानावर नाशिक महसूल विभागातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांच्या सहयोगातून आयोजित साईज्योती स्वयंसहायता यात्रा - 2018 या प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे उद्धाटन पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे होते. यावेळी जिल्हा परीषद अध्यक्ष शालिनी विखे, महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपाध्यक्षा राजश्री घुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड, वसंत गरुडकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, अशा प्रकारचे प्रदर्शन हे महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी आणि थेट मार्केटिंगसाठी उपयुक्त आहे. यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो. विविध भागातल्या खाद्यसंस्कृतीची झलक या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिसते.विरोधीपक्षनेते विखे म्हणाले की, बचत गटांची चळवळ वाढण्यात नेहमीच प्रयत्न केले. बचत गटांना चार टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्यात सर्वप्रथम आपल्या जिल्हा बँकेने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी राष्ट्रीय स्तरावर झाली आणि नाबार्डमार्फत अर्थपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीयकृत बँका मात्र बचत गटांना मदत करत नाहीत. महिला सक्षमीकरणासाठी माझ्या संस्थांमध्ये पत्नीच्या सहीशिवाय पगार काढता येणार नाही अशी पद्धत सुरु करणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव कालापहाड यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लहान मुला-मुलींच्या ढोलपथकाने तसेच शालेय मुलींच्या लेझीमपथकाने लक्ष वेधून घेतले.