Tue, Jul 23, 2019 13:25होमपेज › Ahamadnagar › ..तर जनावरे पाहुण्यांकडे सोडा!

..तर जनावरे पाहुण्यांकडे सोडा!

Published On: Dec 07 2018 1:49AM | Last Updated: Dec 07 2018 1:49AM
नगर : प्रतिनिधी

चारा-पाण्याची सोय होत नसेल, तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन घाला, असा अजब सल्ला जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी शेतकर्‍यांना दिला. त्यांच्या या वक्‍तव्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाल्याने, त्यांच्यावर चोहोबाजूने जोरदार टीका व निषेध व्यक्‍त होताना दिसत आहे.

पावसाअभावी नगर जिल्ह्याच्या सर्वच भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जनावरांना चारा आणि पाण्याचाही प्रश्‍न गंभीर बनला आहे. या पार्श्‍वभूमीवर पाथर्डीच्या शेतकर्‍यांनी गुरूवारी (दि.6) पालकमंत्री शिंदे यांची भेट घेऊन, जनावरांसाठी चारा-पाण्याची सोय होत नसल्याची तक्रार करीत जिल्ह्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. मात्र, या गंभीर समस्येवर उपाय सुचविताना पालकमंत्री शिंदे यांनी त्यांना जनावरे पाहुण्यांकडे नेऊन घालण्याचा अजब सल्ला दिला. त्यामुळे शेतकर्‍यांनी कपाळावर हात मारून घेत तेथून निघून जाणे पसंत केले.

दरम्यान, पालकमंत्री शिंदे यांच्या या वक्‍तव्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने, शेतकरीवर्गातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत येथे काल सायंकाळी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून वक्‍तव्याचा निषेध करण्यात आला. दुष्काळात पालकमंत्र्यांनी शेतकर्‍यांची थट्टा करून त्यांच्या जखमेवर मीठ  चोळले असल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त करण्यात आली. दुष्काळात मदत मागणार्‍या शेतकर्‍यांचा अपमान केल्याने, त्यांना आमदार, मंत्री राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनेही पालकमंत्री शिंदे यांचा निषेध करण्यात आला. सरकारला गंभीर दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करता येत नसतील, तर सत्ता सोडावी, असा सल्लाही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. पालकमंत्री शिंदे यांनी तात्काळ दुष्काळग्रस्त शेतक-यांची माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे बुधवारी (दि.5) केंद्रीय पथक दुष्काळी पाहणी करण्यासाठी जिल्हा दौर्‍यावर आलेले असताना, पाथर्डी विश्रामगृहावर त्यांची वाट पाहत थांबलेल्या पालकमंत्री शिंदे यांनी अनौपचारिकपणे बोलताना सांगितले की, केंद्र सरकारच्या तरतुदीनुसार जिल्ह्यात चारा छावण्याच राज्यात सुरू कराव्या लागतील. सर्रासपणे शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर पैसे देणे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे शक्य होणार नाही. मागणी आराखडा केंद्राकडून मंजूर होताच सर्व उपाययोजना सुरु केल्या जातील. छावणी चालकांकडून कुठेही गैरव्यवहार होणार नाही, यासाठी कडक उपाययोजना केल्या जातील. जिल्ह्यात चारा कमी पडल्यास रेल्वेने चारा उपलब्ध करू, असेही सांगितले होते. मात्र, गुरूवारी केलेल्या वक्‍तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत.

वक्‍तव्य जाणीवपूर्वक व्हायरल : ना. शिंदे

दरम्यान, चारा छावण्यांसंबंधीचे आपले वक्तव्य जाणीवपूर्वक व्हायरल केले गेल्याचा आरोप पालकमंत्री राम शिंदे यांनी केला आहे. अद्याप कोठेच चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. ग्रामीण भागात अडचणीच्या काळात पाहुण्यांची मदत घेण्याचा पद्धत आहेच. त्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांच्या मताशी सहमत होत आपण हे वक्तव्य केले होते, असे स्पष्टीकरण देत पालकमंत्री शिंदे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.